Thursday, Feb 22nd

Headlines:

प्रा. श्रीकांत मलुष्टे यांच्या ‘असा मी तसा मी’ पुस्तकाचे प्रकाशन

E-mail Print PDF
malushte-sir-photo
रत्नागिरी ः रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार प्रा. श्रीकांत मलुष्टे यांच्या ‘असा मी तसा मी’ या पुस्तकाचे प्रकाशन काल (ता. २४) सायंकाळी वाचनालयाच्या सभागृहात झाले.  यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक अशोक बेंडखळे, प्रमुख पाहुणे निवृत्त न्यायमूर्ती भास्करराव शेट्ये, संधीकाल प्रकाशनचे अरविंद जोशी, श्री. मलुष्टे आणि वाचनालयाचे अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन उपस्थित होते.
फोटोग्राफी व अन्य विविध क्षेत्रांतील आत्मकथनाने मराठी भाषा समृद्ध होत आहे. प्रा. श्रीकांत मलुष्टे यांनी केवळ प्रोफेसर म्हणून नव्हे तर फोटोग्राफी क्षेत्राला नवा आयाम दिला. तत्वनिष्ठ स्वभाव, उत्कृष्टतेचा ध्यास असल्याने त्यांचे जीवन अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन यांनी श्री. बेंडखळे व्यक्त केले.
श्री. मलुष्टे म्हणाले, ‘‘मुंबई कर्मभूमी असली तरीही रत्नागिरी माझी धर्मभूमी आहे. वाचनालयाचे ग्रंथपाल ग. म. आजगावकर असताना मलाही येथे काही महिने काम करण्याची संधी मिळाली. त्यातून असंख्य पुस्तके वाचून काढली. या पुस्तकातून रत्नागिरीचा जुना इतिहास, सणसंस्कृती मांडली आहे. मुंबईत पार्ले व महाराष्ट्र कॉलेजमध्ये प्राध्यापकी केली. त्यानंतर फोटोग्राफीकडे वळलो. प्रायोगिक व व्यावसायिक नाटके केली. आजही कोणत्याही शाळेत गेल्यावर आनंद मिळतो.’’
श्री. शेट्ये यांनी पुस्तकाचा थोडक्यात आढावा घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. ऍड. पटवर्धन यांनी वाचनालयाला पुस्तक प्रकाशनाद्वारे संधी मिळाल्याबद्दल आदर व्यक्त केला. १८७ वर्षांच्या या वाचनालयाचा येत्या काही वर्षांत अधिक विकास आणि वाचकाभिमुख सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
श्री. मलुष्टे यांचे शिष्य व रत्नागिरीतील प्रख्यात फोटोग्राफर गणेश खवळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आज या क्षेत्रात जो काही आहे तो मलुष्टे यांच्यामुळेच असल्याचे आवर्जून सांगितले. सौ. दीप्ती कानविंदे यांनी सूत्रसंचालन केले.