दिनांक:
10वीनंतर काय?
हा प्रश्न 10वीच्या सर्वच विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना पडलेला मोठा प्रश्नच आहे. यासाठी आमच्याकडे उत्तर आहे ते म्हणजे महाराष्ट्र शासनाने सन 2011-2012 या शैक्षणिक वर्षात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत सुरु केलेला भारतातील पहिला मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम.
भारताला खारे, निम-खारे व गोडया पाण्यातील मत्स्योत्पादनाच्या अमर्यादीत नैसर्गिक साठयांची देणगी लाभली आहे. या मत्स्य साठयांचा वापर देशातील जनतेला या मत्स्य क्षेत्रातील रोजगार व यावर आधारीत विविध उद्योगधंदे सुरु करण्याच्या अनमोल संधी उपलब्ध झाल्या आहेत. भविष्यात विविध प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान व अत्याधुनिक यंत्रसामुग्री यांचा वापर करुन स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मत्स्योत्पादनात वाढ करण्यास मोठा वाव आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य प्रशिक्षण घेऊन या सर्व तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास केलेले मनुष्यबळ या तीन वर्षांचा मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाद्वारे त्वरीत उपलब्ध होणार आहे.
हा तीन वर्षांचा मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम अभ्यासीत असताना विद्यार्थी नाविन्यपूर्ण प्रशिक्षणाबरोबरच आपल्या आवडीच्या अ. मासेमारी नौका बांधणी व मरीन इंजिन, ब. मासेमारी तंत्रज्ञान, क. मत्स्य प्रक्रिया आणि शीतकीकरण यंत्रसामुग्री, ड. मत्स्य संवर्धन अभियांत्रिकी या चार विषयांपैकी विशिष्ट अशा एका विषयाचे सम्यक ज्ञान व प्रत्यक्ष क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव आत्मसात करुन आपल्या पदविका अभ्यासक्रम पूर्ण करतील. मत्स्य विद्याशाखा अंतर्गत 2011-12 या शैक्षणिक वर्षात सुरु होणाऱ्या तीन वर्षांच्या मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमातील प्रवेश क्षमता 20 असून अभ्यासक्रमाचे माध्यम इंग्रजी आहे. तसेच हा अभ्यासक्रम तीन वर्षांतील सहा सत्रांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.
प्रवेश कसा घ्याल?
या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रमाचे शुल्क, अभ्यासक्रमाचे स्वरुप इ. बद्दलची इत्यंभूत माहिती, या अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका व प्रवेश अजं डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील कुलसचिवांचे कार्यालय आणि मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथे रु. 25 एवढे शुल्क भरुन कार्यालयीन वेळेत कामकाजाचे दिवशी दि. 12 जुलै 2011 पर्यंतच उपलब्ध होतील.
अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहेत. जर या संकेत स्थळावरुन अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज प्राप्त केला असेल तर रु. 25 एवढया रकमेचा डिमांड ड्राफ्ट डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांचे नावे काढून विहीत नमुन्यातील भरलेल्या प्रवेश अर्जासोबत जोडावा.
अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज टपालाद्वारे पाठविण्यात येणार नाही. विहीत नमुन्यातील भरलेला प्रवेश अर्ज, प्रवेश प्रक्रिया शुल्क आणि अर्जाचे शुल्क (जर संकेत स्थळावरुन अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज प्राप्त केला गेला असेल तर) माहिती पुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे कुलसचिव डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी- 415 712, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयात दि. 12 जुलै 2011 पर्यंतचजमा करावेत. या तारखेनंतर आलेल्या प्रवेश अर्जांचा विचार केला जाणार नाही. टपाल विलंबास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार नाही.
पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर काय?
हा तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या यशस्वी विद्यार्थ्याला/ विद्यार्थिनीला जर यापुढेही जाऊन या मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पुढचे शिक्षण घ्यावयाचे असल्यास यशस्वी विद्यार्थी/ विद्यार्थिनी बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स (बी.एफ.एसस्सी) या पदवी अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेनुसार थेट द्वितीय वर्षात मर्यादित प्रवेश मिळवू शकेल. तसेच मासेमारी नौका बांधणी व मरीन इंजिन, मासेमारी तंत्रज्ञान, मत्स्य प्रक्रिया आणि शीतकीकरण यंत्रसामुग्री, मत्स्य संवर्धन अभियांत्रिकी या क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय अथवा काम करण्याची संधी उपलब्ध होईल.
संपर्क : प्रकल्प अधिकारी आणि सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी
दूरध्वनी : 02352- 232678, 232125, फॅक्स- 02352- 232987