दिनांक:
> मुख्यपान
 
करियर आणि कर्तव्य
-दत्ता मुकुंद सावंत
> मुख्यपान
  पान 1
दिनांक: 23-07-2010
करिअर या शब्दाला आज निरतिशय स्वरुपाचे महत्व आले आहे. आजचे जीवन फास्ट झाले आहे. संधीसाठी जो तो स्पर्धेत पळत आहे. येनकेन प्रकारे संधी प्राप्त करणे हाच आजच्या युगाचा ध्येयवाद बनला आहे. संधी चुकली की, ''आपुल्या आयुष्याचे नुकसान झाले'' असे हताश उद्गार काढलेले कालचे तरुण आज प्रपंचासाठी मनाविरुध्द आपली फरफट करुन घेताना दिसतात. प्रत्येक तरुण-तरुणींची करियर विषयी काही स्वप्ने असतात. ती सर्वांचीच सफल होतातच असे नव्हे. तरीही ती माणसे जीवन जगत असतात. काही कष्टी मने करुन तर कित्येकजण आहे त्यात समाधान मानण्याची आपल्या मनाची समजूत घालून पुढील आयुष्य ढकलत असतात. शेवटी नशिब म्हणूनही काही भाग असतो. मग दु:ख करत बसण्यात काय अर्थ आहे बरे ? हेही करिअरमागे धावणाऱ्या स्वप्नाळू तरुणतरुणींनी लक्षात घेऊन आपले आयुष्य सावरायला हवे.
'आयुष्य हा तह आहे' असे वि.स. खांडेकरानी त्यांच्या एका कादंबरीत लिहून ठेवले आहे. तरजोड करुनच जीवन जगायचे असते ! मनाविरुध्द बायको मिळाळी म्हणून काही कोणी संसाराचा खेळ उधळून टाकीत नाही. 'पदरी पडलं पवित्र झालं' असं म्हणून संसारी पुरुष स्वत: ऍडजस्ट होणे पत्करतो. युवा वर्गाने करिअरसाठी अपेक्षित नोकरी धंद्यासाठी जीवतोड मेहनत केल्यावर जर अपेक्षापूर्ण न झाली तर तडजोड करुन समाधानी वृत्तीने जगायला हवे.
न जाणो नशिब आणि प्रयत्न असेल तर सुरवातीला चुकलेल्या संधी अधिक चांगल्या स्वरुपात भविष्य काळात चालून येऊ शकतात. तशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळे कधीही कोणीही तरुणानी आपल्या करिअरविषयी निराश राहू नये. किंवा त्राग्याने आपल्या हातात सध्या जे आहे त्यावर लाथ मारु नये.
यात एक बाब सांगण्यासारखी आहे. अनेक तरुण चिडचिडतात. माझी घरची परिस्थिती अशी म्हणून संधी साधता आली नाही. आईवडिलांची जबाबदारी असल्याने अमेरिकेतला जॉब सोडावा लागला. शेवटी मनाचे समाधान हेही खूप महत्त्वाचे असते. उत्तम नोकरी एवढ ाच तो आहे त्यात सुखी होऊ शकतो. अखेरीस सुख हे मानण्यावर आहे असे पूर्वापार म्हटले जात आहे ते खोटे का मानावं ? शेवटी कतृत्वाबरोबरच कर्तव्य हे देखील महत्त्वाचे असते. युवकांचे भविष्याशी नाते निश्चितच आहे तथापि ते नाते निर्माण करताना भूतकाळाच्या बांधीलकीशी नाळ तोडली तर पुढे अपुऱ्या आयुष्याची खंत लागून राहाते. अनेक वृध्दांच्या हळहळीच्या उद्गारातून हे प्रकर्षाने जाणवते. अपयश मिळूनही परतावयचे आणि यश मिळूनही पस्तावायचेच याला काही अर्थ नाही. यासाठीच करियरचा विचार करताना तो तारतम्यनेच करयला हवा. उगाच खंत बाळगू नये वा अतिरिक्त हावही बाळगू नये. यामुळे दु:ख पदरात येते. आयुष्यात ते टाळण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.
माणूस पैशााच्या माध्यमातून सारे काही मिळवितो,उपभोगतो मात्र मनाशी जे सांभाळतचं ते आत्मिक सुख गमावतो. करिअरच्या नादी लागून उच्चपदाला पोचल्यानंतरही गावाकडील गोष्टी काढून खंत कुरवळणारी माणसे आढळतात. त्यावरुनही बोध घेता येऊ शकतो. पैशाने आपण सारेच काही साधू शकत नाही हे अशावेळी अधोरेखित होते. माणूस नोकरी-धंद्यासाठी आईवडिलांपासून दूर जातो. पूर्वायुष्यात त्याला आई-बापांना सुखी करण्याची आकांक्षा असते, त्यासाठी तो नोकरीची संधी मिळवितो. तथापि आई-वडिलाना तो केवळ पैसे तेवढेच, एवढया दूरवरुन पाठवू शकतो. ज्या आई-वडिलांनी स्वत:च्या आयुष्याची पर्वा न करता आपल्या लेकराचे जीवापाड संगोपन केले त्याच आई-वडिलांची गलितगाय अवस्था असता सेवेला राहू दे. पण अंथरुणावरुन उठणेही कठीण असलेल्या माता-पित्याना हाताशी काही हवे नको ते पाहायलाही कोणी जवळचे नसते. असतो तो केवळ मुलाने पाठविलेला पैसा. आई-वडिलांना सुखी करण्याच्या स्वप्नावर पुढल्या काळात करिअरचे स्वप्न मात्र करते नि जीवनातून भूतकाळ विस्मृत होतो.
कधी तरी मी ऐकलेली घटना याठिकाणी सांगावीशी वाटते. एक उच्चपदस्थ मुलगा नेहमीच रात्रंदिवस आपल्या कामात गुरफटून गेलेला असतो. गाव जवळ असले तरी घरी जायला त्याला सवड नसते. बायको मुलांसह उच्चभ्र सोसायटीची सूखे उपभोगण्यात तो मश्गुळ असतो. पाच-दहा हजार कुणाला त्याने दिले तर तो ते परत मिळण्याची अपेक्षाच करीत नसे. खूप पैसा आहे तो खर्च करण्याची दानतही त्याच्यापाशी होती. या ग्रहस्थाचा एका तशाच सोयायटीने सत्कार केला. त्याने ज्या वृध्दाश्रमात आई-वडिलांना ठेवले होते त्या वध्दाश्रमाला त्याने मोठी देणगी दिली होती. त्या माणसाचा सत्कार केवळ दानशूर म्हणून झालेला नव्हता तर एक थोर मातृ-पितृ भक्त म्हणून करण्यात आला होता. या गौरव समारंभाला त्याचे वृध्द आई-वडिलही इतरांप्रमाणे उपस्थित होते. दोघांच्याही डोळयातले पाणी खळत नव्हते. ते आनंदाश्रु होते की आपल्यासाठी दरमहा प्रचंड खर्च करणारा मुलगा व त्याची बायकोमुले आपली कधीही सेवा करीत नाहीत, नि त्यांच्या मातृ-पितृ भक्त म्हणून गौरव होतो या विषादाचे तर ते अश्रु नसतील ना ?
करिअरच्या मागे लागताना माणूसकीशी लागेबांधे नसेल, जन्मदात्यांशी कृतज्ञता नसेल तर असले उच्च यश मनाला पुढे खरोखर समाधान मिळवून देईल का याचाही अंतर्मूख होऊन करिअर मागे धावणाऱ्या तरुणानी विचार करायला हवा. प्रत्येकवेळी संधी सोडलीच पाहिजे असे नव्हे, घराण्यातला आई-वडिलांचा वसाच पुत्र किंवा कन्या पुढे चालवित असतात. मग त्यातून नेमके त्यानाच वगळून कसे चालेल ? जिची भूरळ उभ्या जगाला आज पडू लागली आहे त्या आपल्या आदर्श मानलेल्या भारतीय संस्कृ तीशी ते सुसंगत होईल का ? उच्चपदावर जरुर पोचा परंतु पायाशी परके होऊ नका एवढेच !
  पान 1
Go To Top Of Page