दिनांक:
> मुख्यपान
 
शिष्यवृत्ती परीक्षांची 'रॅट रेस'
-डॉ. स्वप्नजा मोहिते
पान 1 पान 2 पान 3
दिनांक: 15-11-2009
आपण केला होता का हो एवढा अभ्यास? हं! आता सिस्टीम बदलली आहे. कॉम्पिटीशनचं युग आहे. अगदी मान्य! पण म्हणून या कोवळया वयाच्या आणि मनाच्या मुलांच 'रोबो'मध्ये रुपांतर करायचं... आपल्या आज्ञा पाळणाऱ्या आणि हुकुमानुसार मार्कांचा पाऊस पाडणाऱ्या ज्ञानाचं प्रदर्शन करणाऱ्या! ज्ञान काय फक्त मिळालेल्या मार्कांनुसारच जोखता येतं.? कधी या मुलांची चर्चा ऐकलीत? या बाह्य जगातून ते काय शिकत आहेत ते बघितलंत कधी? पण यासाठी वेळ कुठे आहे आपल्याला?
आपण फक्त आजच्या कॉम्पिटीशनच्या युगाजी चर्चा करणार आणि आपण आपलं मुल या कॉम्पिटिशनमध्ये कुठवर पोहचवलं याचे हिशोब मांडणार! यात ते मुल फरफटत चालतय की कुठे अडखळत, पडत चालतय याचा कोणी विचार करायचा? आणि तसं होतच असेल तर आपल्याकडे किती तरी शस्त्र आहेत, नाही का? रागावणं, मारण, त्यांना धमक्या देणं टि.व्ही. बघायला, मित्र-मैत्रिणींकडे जायला बंदी... म्हणजे सगळे नकारात्मक उपाय आपल्याकडे तयारच असतात. भरीस भर म्हणून क्लासेसचा ससेमिरा असतोच सोबत! चाईल्ड सायकॉलॉजीवर जोरजोरात चर्चा करायची आणि त्यातली तत्व आपल्यापुरती तरी विसरुन जायची असंच आपलं वागणं! कधी तरी स्वतःच्या मनात डोकावलात तुम्ही! मग एकदाच, फक्त एकदाच डोळे बंद करून, स्वतःला विचारा हे प्रश्न आणि शोधा त्यांची प्रामाणिक उत्तरं.
मुळात या कॉम्पिटीशन्स कुणी सुरू केल्या? त्यांचे मूळ हेतू काय होते? शालेय शिक्षणाचे रोपटे आपल्याकडे रूजवताना, शिक्षण सर्वांपर्यंत पोहचवावे या उद्देशातून शिष्यवृत्ती देण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. ज्यांना शिक्षणासाठी खर्च करण्याची कुवत नाही पण शिक्षण घेण्याची इच्छा आहे. अशांना मदतीचा हात म्हणून शिष्यवृत्ती! त्यातही परत ही मदत योग्य हाती पडावी म्हणून त्यासाठी परिक्षा घेऊन, गुणवत्तेच्या निकषावर शिष्यवृत्ती देण्यात येत होती. यामुळे कित्येक गरीब पण हुशार आणि होतकरू विद्यार्थी पुढे गेले पण आज यातला हा मूळ हेतूच आपण विसरुन गेलो आहोत. आर्थिकदृष्टया सक्षम असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षांना बसवले जातात. क्लासेसची फी भरून त्यांची या परीक्षांसाठी तयारी करून घेतली जाते आणि हे 'गुणवंत' विद्यार्थी मग ज्यांना खरच शिष्यवृत्तीची गरज आहे अशा विद्यार्थ्यांशी कॉम्पिट करतात, गुणवत्ता यादीतही येतात आणि शिष्यवृत्ती मिळवतात. खरच गरज असते अशा आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीची? का अडवतो आपण मग मार्ग खऱ्या गरजू विद्यार्थ्यांचा? खरं तर या शिष्यवृत्ती परीक्षांकडे बघण्याची आपली मानसिकताच चुकत चालली आहे की आपली अतृप्त राहिलेली, प्रत्यक्षात न आलेली स्वप्न आपण आपल्या पाल्यांच्या माध्यमातून पुरी करण्यासाठी प्रयत्न करतोय? कधी तरी अशावेळी आपण आपले शालेय प्रवासाची गुणपत्रिका परत नजरेखालून घातली तर? मुलांनी अभ्यास जरूर करायला हवा पण हा आंधळेपणात पाठांतर करत, घोकंपट्टी करत केलेला अभ्यास त्यांची कुठवर साथ देईल याचा कधीतरी विचार केला आपण?
परिक्षा संपली. मुलं पुढच्या काही दिवसात तरी काहीतरी स्वतःला आवडेल असं करू या असं स्वप्न पहात घरोघरी परतली. पण परिक्षेनं त्यांची पाठ अजूनही सोडली नाहीये. घरी गेल्या गेल्या परत प्रश्नपत्रिका सोडण्याची फर्मान सुटत आहेत. शाळेत परत प्रश्नपत्रिकांवर चर्चा घडत आहेत. प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जात आहेत. मुलांनी परीक्षा दिली आणि उत्तरपत्रिका पर्यवेक्षकांच्या सुपूर्द केली की विषय संपला नं? मग परत परत त्या प्रश्नपत्रिका सोडवून, त्यातल्या चुकांचा हिशोब मांडून, मुलांना त्या चुका परत परत दाखवून त्यांच्या मानसिकतेवर आघात का करत राहतो आपण? यातून या मुलांच्या मनावर काय परिणाम होतात याचा विचार केलाय कोणी? चुका दाखवून मानसिक खच्चीकरण करण्यापेक्षा, जी उत्तरं बरोबर आहेत त्यासाठी प्रशंसा करण्यात कमीपणा वाटतो का आपल्याला? आपण पालक आहोत किंवा आपण शिक्षक आहोत म्हणून हे सगळयांचा आपला हक्क आहे, हे म्हणणं किती संयुक्तिक आहे? यातून आपण मुलांना नैराश्याच्या अंधाऱ्या गर्तेत ढकलण्याची पहिली पायरी चढतो आणि हळूहळू हे विषय मुलांच्या मनात भिनत जात परिणीती? मुलं अभ्यासाच्या ओझ्यानं आणखीनच थकून जातात. चिडचिडी बनतात, मनात कुढत राहतात. मग त्यांच्या मनात शिक्षणंही मुश्किल होऊन बसतं. जेव्हा आपण जागे होतो तोवर वेळ निघून गेलेली असते!
या सगळया पार्श्वभूमीवर दोन चित्र मला ठळकपणे सांगाविशी वाटतात. पहिलं चित्र... परीक्षेमधल्या ब्रेकमध्ये दोन-चार उत्तरं चुकली म्हणून परिक्षाकेंद्रावरच रडणारी एक आई आणि ती रडते म्हणून रडणारा तिचा लेक. ग्लास लवंडून थोडा रिकामा झाला म्हणून रडणारे हे दोघे! पण अजून पुढचा पेपर शिल्लक आहे, त्याचा विचार करण्याऐवजी सांडलेल्या ग्लासबद्दल रडणारे हे दोघे! दुसरं चित्र माझ्या मैत्रिणीचं आणि तिच्या लेकाचं! अभ्यासात मुळातच हुशार असणारा तिच्या मुलावर तिनं अभ्यास कधी लादला नाहीच. पण जेव्हा शाळा, अभ्यासाच्या, पाठांतराच्या हात धुवून मागे लागली तेव्हा तिनं त्याला स्वतःच वेळेचा कसा उपयोग करायचा ते ठरवायची मुभा दिली. त्याला कसल्याही बंधनात न बांधता, अभ्यासासाठी योग्य वेळ स्वतःच ठरवण्याचं स्वातंत्र्य दिलं. परीक्षेच्या दिवशी वा परत झाल्या पेपरवर चर्चा केली वा ते परत परत सोडवून घेतले. परीक्षा संपल्यावर झालेले पेपर्स पुस्तकांसहित कपाटात टाकले आणि संध्याकाळी लेकाला छानपैकी समुद्रकिनारी छोटयाशा ट्रीपसाठी आई-बाबांनी मित्रांसमवेत नेलं. मुक्त हुंदडू दिलं. याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे शाळेत जेव्हा पेपर सोडवून घेण्याचं टुमणं लावलं तेव्हा आई बाबा दोघांनीही शाळेला स्पष्ट पण ठाम शब्दात त्यासाठी नकार कळवला. गुणवत्ता यादीत येण्याची आपल्या लेकाची क्षमता त्यांनी ओळखली आहे पण ही यादी त्यांच्यादृष्टीने गौण आहे. पुढच्या आयुष्यात द्याव्या लागणाऱ्यां असंख्य परीक्षांसाठीचा 'स्टेपिंग स्टोन' म्हणून ते या शिष्यवृत्ती परीक्षेकडे पहात आहेत. इथेच त्यांच्यातला सक्षम आणि खरा पालक मला दिसत आहे. अशा सशक्त पालकत्वाची आज खरच गरज आहे. नाहीतर नैराश्याच्या गर्तेत गुरफटत जाणारी पिढी निर्माण करतात, त्या परीक्षा आणि गुणवत्ता यादीच्या स्वप्नात उर फुटेस्तोवर धावतात ते पालक अशा नव्या व्याख्या दृढ होण्यास उशीर लागणार नाही!
पान 1 पान 2 पान 3
Go To Top Of Page