दिनांक:
> मुख्यपान
 
विचारधनमंजूषा
 
पान1 पान2
दिनांक: 01-08-2010
विचारधनमंजूषा
(स्वामी स्वरुपानंद)
रत्नागिरी प्रांती । पावस ग्रामात ।
स्वयंभू दैवत विश्वेश्वर॥
नको मज मुक्ति । नकोचि संपत्ति
संतांची संगती देई नित्य
स्वामी म्हणे मग । सुखे गर्भवासी।
घालावे आम्हासी तुकया परी॥
पावसचे स्वामी स्वरुपानंद हे आधुनिक काळातले थोर संत. दि. 15/8/1974 ला स्वामींचं महानिर्वाण झालं. आदर्श जिज्ञासू विद्यार्थी, उत्तम मित्र, सद्गुरुंचा प्रिय शिष्य, प्रासादिक आध्यात्मिक काव्यरचना करणारे प्रतिभावंत कवी, राष्ट्रीय विचार धारेचा वारसा चालवणारे शिक्षक आणि अभंग ज्ञानेश्वरीचे कवी, अशा विविध रुपांचं दर्शन स्वामींच्या काव्यातून होत असतं. वाचकमन सुखावत असतं.
कवी स्वरुपानंदानी विपुल लेखन केल आहे. आपला परिचय देताना रत्नागिरी प्रांतातलं पावस गाव, स्वयंभू दैवत विश्वेश्वर अशी माहिती देऊन स्वामी म्हणतात-हे विश्वात्मका मला मुक्तीचा ध्यास नाही संपत्तीची लालसा नाही. संतांची संगती मात्र द्यावी. ही माझी विनंती मान्य करुन मग खुशाल गर्भवासी घातलंस तरी हरकत नाही. हे मागणं तरी मी का मागतोय ? कारण माझा आदर्श आहेत संत तुकाराम. त्यानीही अशीच इच्छा व्यक्त केली आहे ना -
न लगे मुक्ती, धनसंपदा। संत संग देई सदा
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी दोन श्रेष्ठ सत्पुरुषांचे सूर जुळतात ते असे !
   
विचारधन मंजूषा
संत नामदेव
असं म्हणतात की पंढरपूरच्या दामाशेटी आणि त्यांची पत्नी याना केशवराजाच्या नवसाने पुत्रप्राप्ती झाली त्यांचं नाव नामदेव. नामदेवांचा जन्म कार्तिक शुध्द एकादशीला इ.स. 1270 मध्ये झाला.
पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त गोतावळा फार मोठा. 'विठू माझा लेकुरवाळा' अशा शब्दात जनाबाईने फार सुरेख शब्दचित्र रेखाटलं आहे. इतर संतांची भक्ती भक्त भगवंत नात्याची तर नामदेवाची भक्ती सखा भावाची. विठ्ठलावर पंढरपुरावर पुंडलिक, चोखोबा, ज्ञानेश्वर भावंडं, गोरोबा इ. संतमेळयावर ज्ञानदेवानी हजारो अभंग रचले आहेत.
नामदेव पांडुरंगाशी लटकं भांडण करतात तेव्हा आपल्या डोळयांसमोर एक सुंदर नाटय उभं राहतं.
'पतितपावन नाम ऐकुनि आलो मी द्वारा।
पतितपावन न होसी म्हणुनि जातो माघारा ॥
देसी तेव्हा घेसी ऐसा अससी उदार।
काय देवा रोधू तुमचे कृपणाचे द्वार ?
सोडी देवा ब्रीद आता न होसी अभिमानी।
पतितपावन नाम तुजला ठेवियले कोणी ?
नामा म्हणे देवा तुझे न लगे मज काही
प्रेम असू द्या हृदयी तुमच्या आठवण पायी॥'
ईश्वराने प्रसन्न होण्यासाठी विरोधी भक्ताने देवाला कृपण, स्वार्थी, व्यापारी वृत्तीचा म्हटलं. ब्रीद परत घ्यायला सांगितलं. इतके आरोप केल्यावर चिडून तरी देवाने कृपा केलीच पाहिजे अशी कृतक कोप नाटयाची व्यूह रचना करणारे नामदेव. विठ्ठलाचे प्रिय भक्त म्हणून आपल्यालाही आवडणारच ! भक्त म्हणून आणि रसाळ भक्तकवी म्हणूनही !
 
विचारमंजूषा -
(रहिमचे दोहे)
 
कोणतीही भाषा संपन्न होते ती तिच्यामध्ये लेखन करणाऱ्या कवी, लेखक विचारवंतांमुळेच इंग्रजी, मराठी, हिेंदी, उर्दू, फारसी, अन्य भाषा भगिनी आपापल्या विचारसंपदेमुळेच मान्यता पावतात. या सदरात अनेक विचारवंत,संत, थोर समाज हितचिंतक यांच्या विचारधनाचा संग्रह पहाणार आहोत.
अब्दुल रहीम खानखाना म्हणजेच 'रहीम 'मुगल सम्राट अकबराच्या 'नवरतन दरबारातले' ज्येष्ट कवी असून जिवनात अनेक चढउतार पाहिल्यामुळे आपल्या विचारांना शब्दरुप देताना जनसामान्यांनाही पटतील अशी उदाहरणे देतात. त्यांच्या काव्यात अरबी, उर्दु,फारसी भाषांचा प्रभाव आणि धार्मिक उच्च विचार, हिंदु धर्माच उत्तम ज्ञान, कृष्णभक्ती अशा विविध छटा दिसून येतात.
'जेहि 'रहीम'मन आपनो किन्हो चारु चकोर। निसिवासर लाग्यो रहे, कृष्णचंद्रकी ओर॥'
ज्या कोणी आपल्या मनाला सुंदर चकोरच मानलं, त्याला सदैव (रात्रंदिवस) श्रीकृष्णरुपी चंद्राकडेच ेएकटक पाहावस वाटणारचं ! रहीम धर्माने मुस्लिम असले तरी अन्य धर्मातलं ज्ञान, कथा, काव्य समजून घेतल्यामुळे त्यांची दृष्टी, विचार, विशाल, उदार झाली. वरील दोह्यातून रहीमयांच निसर्गप्रेम आणि कृष्णभक्ती दिसून येते. आज हाच विचार 'अल्ला तेरोनाम ईश्वर तेरो नाम, सबको संन्मती दो भगवान' यात दिसतो.
 
 
पान1 पान2
Go To Top Of Page