दिनांक:
> मुख्यपान
 
पल्स पोलिओ लसीकरण मोहिम : दिनांक 10 जानेवारी 2010 व 7 फेब्रुवारी 2010
   
> मुख्यपान
  पान 1
दिनांक: 02-01-2010
जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओ मुक्त जग करण्याचा निर्धार केलेला आहे. त्यानुसार युध्द पातळीवर ही मोहिम राबविण्यात येत आहे. आपल्याला सुध्दा पोलिओ मुक्त भारत करावयाचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या मानव सेवी कार्यक्रमाला भारताने सुध्दा आपले ध्येय मानलेले आहे. 5 वर्षाखालील बालकांना पोलिओ हा रोग अपंगत्व आणतो. व त्यामुळे बाळाचे लुळेपणामुळे भविष्य अंध:कारमय होते. पूर्वी पोलिओचे प्रमाण खूप होते. परंतु पोलिओ लसीकरणामुळे पोलिओ आजार आपण हद्दपार करण्यास यशस्वी झालो. सध्या बिहार व उत्तर प्रदेश या राज्यामध्येच पोलिओचे जास्त रुग्ण आढळून आले आहे. देशात 2009 साली 624 रुग्ण आढळले असून राज्यात यावर्षी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
गेली 13 वर्षापासून पल्स पोलिओ मोहिम आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वीपणे राबविणे सुरु आहे. त्यामुळे पोलिओ मुक्त भारत व महाराष्ट्र हे आपले स्वप्न अगदी जवळ आहे.
यावर्षी सुध्दा दिनांक 10 जानेवारी 2010 व 7 फेब्रुवारी 2010 रोजी ही मोहिम राबविण्यात येत आहेत. यावेळी 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आपली युध्द पातळीवर तयारी सुरु आहे.
पोलिओ हा संसर्गजन्य रोग असून तो विषाणूपासून पसरतो. हे विषाणू तीन प्रकारचे आहेत. टाईप 1, टाईप 2, टाईप3. हे विषाणू दुषित पाण्यामुळे व्यक्तिच्या शरीरात प्रवेश करतात.
लहान आतडयामध्ये या विषाणूंची वाढ होते. परंतु हा रोग सर्वानच होत नाही. रोग प्रतिकारक शक्ति कमी असलेल्या किंवा नसलेल्या व्यक्तिच्या लहान आतडयापासून हे विषाणू मज्जारज्जूवर हल्ला करतात आणि हात किंवा पाय लुळा पडून ती व्यक्ती अपंग होते. 90 टक्के रोगी 0ते 5 वर्षे वयोगटामध्ये आढळतात. एकदा या आजारामुळे अपंगत्व आले की यास औषधोपचार नाहीत. असा हा माणसाला परावलंबी बनविणारा, अपंगत्व आणणारा दुर्धर रोग आहे.
सर्वसाधारणपणे 100 मुलांमध्ये जर पोलिओचे विषाणू शरीरात गेले तर त्यापैकी फक्त एका मुलामध्ये बाल पक्षाघात किंवा अपंगत्व येते. हे प्रमाण जरी अल्प वाटत असले तरीपण कुणाचेही मूल अपंग नको व म्हणूनच पोलिओ मुक्त भारत ही संकल्पना मूर्त रूपात आपणास साकार करावयाची आहे. हे विषाणू शरीरात गेल्यावर तंज्जातंतूवर आघात करतात व निकामी मज्जातंतूमुळे अपंगत्व येते.
ह्या आजाराचा प्रसार हा परिसर अस्वच्छतेचा अभाव व पिण्याचे पाणी, पदार्थ विष्ठा याद्वारे प्रसार होतो. एका मुलाकडे हे विषाणू 3 महिन्यापर्यत जिवंत राहू शकतात. पोलिओची लस सर्व प्रथम डॉ.साल्क यांनी सन 1955 मध्ये विकसित केली. मृत विषाणू पासून तयार केलेली ही लस इंजेक्शनद्वारे टोचली जात होती. नंतर सन 1961 मध्ये सॅबिन यांनी पोलिओचे थेंब रुपात तोंडावाटे पाजण्याकरीता गोड औषधी रुपात तयार केली.
जागतिक आरोग्य संघटनेने या लसीची शिफारस करुन सर्व जगभर ही लस वापरण्यात येत आहे. तोंडावाटे ही लस देणे सोपी व स्वस्त आहे म्हणून सर्व बालकांना जन्मानंतर लगेचच नंतर बालक दिड महिन्याचे झाल्यावर प्रथम मात्रा 1 महिन्याच्या अंतराने द्यावयाच्या असतात.
गेल्या काही वर्षात जवळ जवळ 150 पेक्षा जास्त देशांनी पोलिओ लसीकरणाद्वारे पोलिओ रोगावर पूर्ण नियंत्रण मिळविलेले आहे. व पल्स पोलिओ, लसीकरणाच्या मोहिमेमुळे आता पोलिओ मुक्त देश करण्याच्या दृष्टिने यशस्वी वाटचाल सुरु आहे. परंतू जोपर्यंत आपल्या वातावरणातून पोलिओ रोगास कारणीभूत विषाणू संपूर्णत: नाहीसे होत नाहीत तोपर्यंत सतत पोलिओ रोग होण्याची भिती राहील म्हणूनच सर्व देशातून म्हणजेच जगातून पोलिओ विषाणू हद्दपार करण्यासाठी सर्व स्तरावर ही मोहीम यशस्वीपणे राबविणे आवश्यक आहे.
दिनांक 10 जानेवारी 2010 व 7 फेब्रुवारी 2010 रोजीच्या पल्स पोलिओ लसीकरणाचा लाभ जिल्ह्यातील 128565, 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये 1899 लसीकरण केंद्र स्थापन करण्यांत आलेली आहेत. तसेच 113 ट्रॅन्झीट टीम ठेवण्यात आलेले आहेत. बसस्थानक रेल्वेस्थानक या ठिकाणी 49 टीम ठेवण्यात आलेले आहेत. एकूण 4375 कर्मचाऱ्याची लसीकरण केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, येथे ही पोलिओ लसीकरणाची मोफत सोय करण्यांत आली आहे. जिल्ह्यामध्ये गेली 12 वर्षे एकही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही.
ही मोहिम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी जिल्हा, तालुका व गांव पातळीवर समन्वय समिती स्थापन करण्यांत आली आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी तसेच लसीकरण केंद्रावरील कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. व्यापक प्रमाणात व जनजागृती मोहिम करण्यात आलेली आहे.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित रहाणार नाही यासाठी संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. ही मोहिम यशस्वी होण्यासाठी सर्व इतर संस्थांचा सहभाग व सहकार्य अपेक्षित आहे. त्यासाठी लायन्स क्लब, रोटरी क्लब, आय.एम.ए., नेहरु युवा केंद्र , आकाशवाणी जिल्हा माहिती कार्यालय, शिक्षण विभाग यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज झाली आहेत. आपल्या कुटुंबातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना दिनांक 10 जानेवारी 2010 व 7 फेब्रुवारी 2010 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून पोलिओ डोस पाजून घ्या, बाळ आजारी असले तरी किंवा यापूर्वी पोलिओ डोस दिला असला तरीही पोलिओ डोस पाजून घ्यावा असे आवाहन करावे.
  पान 1
Go To Top Of Page