दिनांक:
> मुख्यपान
 
पॅरॅलिसिस आणि फिजिओथेरापी
डॉ. दिलीप पाखरे
फिजिओथेरापीस्ट, रत्नागिरी, फोन : 228612, 9970202049
> मुख्यपान
  पान 1 पान 2
दिनांक: 15-11-2009
आपण सर्वांनीच कधी तरी हे बघितलेलच असतं. शेजारी पाजारी एकाएकी चालती बोलती व्यक्ती जागच्या जागी कोसळते. बेशुध्द होते. कधी होतही नाही.मात्र त्या व्यक्तीची कधी उजवी तर कधी डावी बाजू लुळी पडते. अशावेळी त्याला पॅरेलिसीस झाला असे आपण म्हणतो. यालाच आपण मराठीत 'अर्धांगवायु' असे संबोधतो.
कशामुळे होत असावा, हा अर्धांगवायु? सर्व सामान्य प्रश्न. त्याचं उत्तर मेंदूतील गंभीर आजार हे होय. मेंदूमध्ये अनेक प्रकारचे आजार होतात. काही अगदीच किरकोळ स्वरूपाचे असतात. फारसे उपचार न करताही बरे होतात.
पण काही मात्र फार गंभीर स्वरूपाचे असतात. काही आजारात रूग्ण चोवीस ते अठ्ठेचाळीस तास किंवा अनेक दिवस बेशुध्दावस्थेत असतात.
आपण मेंदूतील गंभीर आजार असं ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी सर्वच आजारांचा विचार करायला हवा. पण आज मी या लेखातून फक्त पॅरॅलिसिस मधील महत्वाचा उपचार म्हणजेच फिजिओथेरापी किंवा भौतिकोपचार याबद्दल आपणाशी संवाद साधणार आहे. म्हणून अर्धांगवायूशी संबंधित मेंदूतील तीन विकार याबाबत किरकोळ बोलणारआहे.
मेंदूतील रक्तवाहिनी फुटून तेथे एकाएकी रक्तस्त्राव होतो. त्यालाच सिरिब्रल हॅमरेज असं म्हणतात. कधी मेंदूतील रक्तवाहिनीतच रक्त घट्ट होऊन म्हणजेच क्लॉट होऊन रक्तवाहिनीतील रक्तप्रवाह अडतो किंवा त्याला अडथळा निर्माण होतो. त्याला सिरिब्रल ओंबोसिस असं म्हणतात. तिसरा प्रकार म्हणजे शरिरातील कुठल्याही भागातील रक्तवाहिनीत रक्त घट्ट होवून तेथे तयार झालेली घट्ट रक्ताची गाठ त्याला एम्बोलस असं म्हणतात. तो रक्तप्रवाहात वाहत येवून मेंदूमधील रक्त वाहिनीत अडकतो. त्यालाच सिरिब्रल एम्बोलिझम असं म्हणतात.
ह्या तीनही प्रकारात काही लक्षण समान असतात. काही अलग असतात पण या तीन्ही प्रकारात अर्धांगवायु होऊन रूग्णाची एक बाजू लुळी पडते. मेंदूच्या उजव्या बाजूला असा गंभीर अपघात किंवा आघात झाल्यास शरीराची डावी बाजू लुळी पडते. मेंदूच्या डाव्या बाजूस असा गंभीर अपघात झाल्यास शरीराची उजवी बाजू लुळी पडते.
मेंदूत प्रत्येक ठिकाणी शरीराची हालचाल नियंत्रीत करण्याची केंद्रे किंवा सेंटर्स असतात. उजवी बाजू लुळी पडल्यास मेंदूच्या डाव्या पाजूस बोलण्याची नियंत्रण कक्षा असते. त्यावर परिणाम होतो. कधी बोलताच येत नाही. कधी अस्पष्ट बोलणं असतं. बोलण्यात बऱ्याच प्रकारच्या विकृती निर्माण होतात.
अर्धांगवायूचा झटका आल्यावर एकदम होणारा हा आघात संपूर्ण कुटुंबालाच आघात ठरतो. जीवनभर धडधाकट राहिलेला माणूस एकाएकी एका बाजूने लुळा पडतो, हा मानसिक आघात सोपा नसतो. पण झालं! त्याला काय करणार. आता आपण या पॅरेलिसिसच्या फिजिओथेरापीकडे वळू या.
अर्धांगवायूत मी जे तीन मेंदूचे गंभीर आजार सांगितले, त्याप्रमाणे तो फरक आपले तज्ञ फिजिशियन आपल्या निदानाद्वारे करतात. मात्र अचानक चालता बोलता माणूस असा अर्धांगवायूचा झटका येवून खाली कोसळला तर त्याला त्वरीत रूग्णालयात किंवा नर्सिंग होम मध्ये दाखल करावे.
ह्या रूग्णांना 24 तास तज्ञ डॉक्टर्सच्या देखरेखीखाली तातडीच्या उपचारांची गरज आणि सेवेची गरज असते. साधारण 3 दिवस ते 7 दिवस कमीत कमी रूग्णाला हॉस्पिटलमध्ये ठेवणं गरजेचं असतं. तीव्रतेप्रमाणे जास्त दिवसही ठेवावे लागते. 'कारण ह्या आजारात प्राथमिक एक्युट अवस्थेत घरी उपचार करता येत नाहीत.'
रूग्ण अचानक कोसळला की रूग्णाच्या शरीराची अकारण हालचाल करू नये. बहुतेक वेळा रूग्ण हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी रूग्णाला कॉटवर झोपवतात. तसे करण्याच्या ऐवजी तो रूग्ण जिथे कोसळला असेल तिथेच जागा मोकळी करावी. एखादी सतरंजी अंथरावी, त्यावर रूग्णाला झोपवावे.
रूग्णाला झोपवताना रूग्णाचे तोंड एका कुशीवर बाजूला वळवून ठेवावे. म्हणजे रूग्णाच्या बेशुध्दावस्थेत रूग्णाच्या घशात लाळ साचून त्याचा श्वास अडणार नाही. श्वास अडून होणारे संभाव्य अपघात टाळता येतील.
या पोझिशनमध्ये रूग्णाची धांदलीत किंवा घाबरून चुकुनही हालचाल करू नये. त्याऐवजी रूग्णाच्या डोक्याच्या आणि खांद्याच्या खाली उशी देवून तो भाग थोडासा उंच करावा. मात्र आताच सांगितल्याप्रमाणे मान एका बाजूला वळवावी.
शरीर एका कुशीवर वळवून ठेवावे. कारण या अर्धांगवायुमध्ये रूग्णाच्या जिभेवरचं नियंत्रणही गेलेलं असतं. अशा अवस्थेत जीभ घशात अडकून रूग्ण गुदमरतो किंवा लाळ घशात अडकून गुदमरतो.
  पान 1 पान 2
Go To Top Of Page