दिनांक:
> मुख्यपान
 
'हापूस'चा परदेश प्रवास
प्रभाकर कासेकर, निवृत्त सहा. माहिती अधिकारी.
> मुख्यपान
    पान 1
दिनांक: 15-11-2009
आम्रफलाची माहिती पुरातन काळापासून भारतीयांना आहे. हजार वर्षापासून या देशात आम्रवृक्ष लावला जात आहे. हे वाङमयातील संदर्भावरून किंवा भारतीय शिल्पकला, मूर्तिकला यावरून कळून येते. आम्रवृक्षाचे मूळ स्थान कोणते याविषयी तज्ञांत अजून मतभेद आहेत. तरीसुध्दा दक्षिण किंवा आग्नेय आशिया व मलाया या प्रदेशांतून आम्रवृक्ष भारतात आला असावा, याविषयी तज्ज्ञात मतैक्य आहे. आम्रवृक्षाचे मूळ स्थान आसाम ब्रह्मदेश या टापूत असण्याचा संभव आहे. असे मत सध्या प्रचलित आहे.
अठराव्या शतकात लिनने आंबे येणारा भारतीय वृक्ष अशा अर्थाचे मॅजिफेरा इंडिका नाव ठेवले. मलायी भाषेतील मांग्गा किंवा तामिळ मांग्गा या नावावरून पोर्तुगीजांनी जे नाव बनविले त्यावरुन नंतर मँगो ट्री हे नाव हे नाव इंग्लिश व इतर युरोपीय भाषांत या वृक्षांना मिळाले. संस्कृत साहित्यात हा वृक्ष अनेक नावाखाली ओळखला जाई.
त्यापैकी आम्र, रसाल ही काही नावे होत. उत्तर भारतीय भाषांत या वृक्षाला आम, आंब, आंबा अशी नावे आहेत. आम म्हणजे सामान्य भारतात हे फळ सर्वसाधारणपणे सर्वत्र उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर सामान्य माणसाचे हे फळ आहे. उत्तरेत हिमालयाच्या उतरणीच्या प्रदेशापासून ते थेट दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या सर्व द्वीप कल्पीय भारतात आम्रवृक्ष वन्य स्थितीत किंवा मुद्याम लावलेला आढळतो.
सर्व प्रकारच्या फळांमध्ये आंब्याला फळांचा राजा म्हणून संबोधिले जाते, हे अगदी रास्त आहे. सध्या देशभर अनेक जातींचे आम्रवृक्ष लावलेले आढळतात. मात्र कोकणातील रत्नागिरी हापूस म्हणून ओळखला जाणारा आंबा हा जगप्रसिध्द असून त्याला फळांचा राजाच नव्हे तर महाराजा म्हणून ओळखले जाते. असा हा आंबा भारताचे राष्ट्रीय फळ आहे असे निर्विवादपणे मानावे लागेल.
कोकणात हापूस आंब्याला मानाचे स्थान आहे. हापूस आंब्याचा उल्लेख लोकगीते, ओव्या यामध्ये हमखास आढळतो. कोकणातील महिलांचा आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो यासारखी अशी पारंपारिक गीते आजही प्रत्येकाच्या ओठावर असतात.
असा हा हापूस आंबा बहुगूणी आणि बहुउपयोगी असा आहे. पिकलेला आंबा हा उत्साहवर्धक, शरिरवर्धक आणि पौष्टीक मानला जातो. आंब्यामध्ये अ, ब, आणि क जीवनस्तवे भरपूर प्रमाणात असतात. पिकलेल्या आंब्यामध्ये अन्य फळांपेक्षा कॅरोटीन हे द्रव्य जास्त प्रमाणात असते. केवळ हापूस आंबा खाण्यापुरताच मर्यादित नाही तर या फळावर प्रक्रिया करुन अनेक प्रकारची उत्पादने तयार केली जातात. त्यामध्ये हिरव्या कच्च्या फळांच्या म्हणजेच आंबा कैरीच्या फोडी करून मुरंबा व गुळंबा अथवा खारवून, तिखट मसाला लावून लोणचे, चटणी करतात. कच्च्या कैऱ्या उकडून त्यातील गरात साखर व पाणी मिसळून पन्हे तयार करतात. याशिवाय पिकलेलल्या आंब्यापासून आमरस, आंबापोळी, स्क्वॅश, जॅम इत्यादी पदार्थ तयार करतात. अलिकडे हवाबंद डब्यात लोणच्याच्या आंबाफोडी आणि आमरस भरून ठेवण्याचा फळप्रक्रिया उद्योग (आंबा कॅनिंग) मोठया प्रमाणात सुरू असून त्यातून कोकणातील आंबा बागायतदारांना आर्थिक व्यवसायाच्या उत्तम संधी उपलब्ध झाल्या आहेत.
अशा या रत्नागिरी हापूस आंब्याच्या लागवडीला अधिक वाव मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदानातून फळबाग लागवडीची योजना कार्यान्वित केल्यानंतर कोकणात लाखो हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आले आहे. तथापि उत्पादक शेतकऱ्यांना मध्यस्थ दलालामुळे योग्य भाव मिळू शकत नाही आणि उत्पादक शेतकरी शेवटपर्यंत आर्थिकदृष्टया दुर्बलच राहतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्याच्या विक्रीचा एक अभ्यास काही वर्षापूर्वी घेण्यात आला, त्यामध्ये आंबा लागवडीची आर्थिक यशस्वीता आंब्याची योग्य भावात विक्री होवून बागायतदाराला लागवड किफायतशीर झाली पाहिजे यावर अवलंबून असल्याचे दिसून आले. या अभ्यासात आंबा विक्रीच्या सर्वसाधारणपणे पुढील चार पध्दती अस्तित्वात असल्याचे दिसून आले.
1) बागायतदारांकडून ग्राहकांना सरळ विक्री
2) बागायतदारांकडून सहकारी सोसायटयांमार्फत विक्री
3) दलालामार्फत आंबा फळांची विक्री
4)बागेला मोहोर येण्यापूर्वी ठेकेदार कमीशन एजंटांना बागेतील फळांची विक्री या विक्री पध्दतींची अधिक माहिती पुढीलप्रमाणे ः-
1) बागायतदारांकडून ग्राहकांना सरळ विक्री पध्दतीचा आंबा बागायतदार मुंबई-पुण्यासारख्या मोठया शहरात थांब्याच्या हंगामात दुकान थाटून ग्राहकांना आंब्याची विक्री करतो. या पध्दतीत मध्यस्थ दलालाचा नफा आंबा बागायतदाराला मिळतो. यात ग्राहकाला देखील योग्य भावात आंबे मिळतात. या विक्री पध्दतीत बागायतदाराला त्याच्या मालाला निव्वळ नफा सर्वात जास्त मिळतो.
2) बागायतदारांनी सहकारी सोसायटयांमार्फत विक्री केल्याने सोसायटी बागायतदारांकडून फळे गोळा करून मोठया शहरात ग्राहकाला थेट विक्री करते. सोसायटी 12 टक्के कमिशन खर्च, विक्री व वाहतूक खर्च कापून घेते. या विक्री पध्दतीत वरच्या विक्री पध्दतीच्या खालोखाल बागायतदाराला त्यांच्या मालाची किंमत मिळते.
3) बागायतदारांनी कमिशन एजंटामार्फत फळांची विक्री सर्वसाधारणपणे मोठया प्रमाणात होते. या पध्दतीने आंब्याची विक्री 34.15 ते 61.32 टक्के एवढया प्रमाणात झालेली या अभ्यासात आढळून आली. कमिशन एजंट, मार्केटिंगचा खर्च व त्याचे कमिशन कापून बागायतदाराला पैसे देतो. दलालाने ग्राहकाला काय भावाने माल विकला याबाबत बागायतदाराला काहीच कळायला मार्ग नसतो. कमिशन एजंट देईल ती रक्कम बागायतदाराला स्विकारावी लागते. हे कमिशन एजंट आंब्याला मोहोर येण्याच्या सुमारास बागायतदाराशी संपर्क साधून बागेची किंमत ठरवतात. काही कमिशन एजंट बागायतदाराला आगावू उचल देतात.
4) काही बागायतदार कमिशन एजंटना, बागेतील फळे तयार होण्यापूर्वीच बागांची फळे विकून टाकतात. या पध्दतीने साधारण 14 टक्के बागांच्या फळांची विक्री होत असल्याचे या अभ्यासात आढळून आले. ही विक्री फळांच्या वेगवेगळया अवस्थेत होत असते. अगदी मोहर आल्यापासून ते फळे पक्व होईपर्यंत वेगवेगळया अवस्थेत बागेतल्या फळांची विक्री या पध्दतीत होत असते. या पध्दतीने केलेल्या विक्रीत बागायतदाराला त्याच्या मालाला सर्वात कमी किंमत अथवा भाव मिळाल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे.
या सर्व अभ्यासात बागायतदाराने ग्राहकाला सरळ विक्री केल्याने बागायतदाराला सर्वात जास्त भाव मिळाल्याचे दिसून आले आहे. कमिशन एजंटामार्फत फळांची विक्री सर्वात जास्त होते. तर सरकारी सोसायटयांमार्फत होणारी विक्री सर्वात कमी झालेली दिसून येते.
 
    पान 1
Go To Top Of Page