![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
| पर्यटकांसाठी निवास - न्याहारी योजना : रोजगारीची नवी संधी! | ||||
|
||||
| > मुख्यपान | ||||
|
||||
| दिनांक: 15-11-2009 | ||||
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे गेली कांही वर्षे निवास व न्याहारी योजना राबविण्यात येत असून अनेक ठिकाणी त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोकणातील विपूल सृष्टीसौंदर्यावर मोहीत झालेले पर्यटक या भागात मोठया संख्येने येऊ लागले आहेत. कृषि पर्यटनाची संकल्पना त्यामुळे खऱ्या अर्थाने साकार होऊ लागली आहे. तथापि पर्यटकांची निवास व न्याहारीची सुविधा पूर्ण करण्यात कोकणात या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसून येत नाही. अगदी थोडक्यात, या योजनेचा परिचय करून द्यावयाचा झाल्यास कोकणात ज्या लोकांचे जुने वाडे किंवा नवीन घरे यापैकी कमीत कमी एक खोली (दोन बेड) ते जास्तीत जास्त पाच खोल्या (दहा बेड) पर्यंत सुस्थितीतील खोल्या जे लोक पर्यटकांना निवासासाठी उपलब्ध करून देऊ शकतात. अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो. त्यासाठी त्यांनी पर्यटन विकास महामंडळाच्या नजिकच्या पर्यटन केंद्र अथवा प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रासह अर्ज करणे आवश्यक असते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यात विविध ठिकाणी पर्यटन संकुले बांधली आहेत. तथापि, पर्यटन विकासाच्या संदर्भात निश्चित केलेल्या सर्व ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे स्वतः किंवा खाजगी संस्थेच्या विद्यमाने पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे आर्थिक आणि प्रशासकीय दृष्टया शक्य होत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी पर्यटकांचा ओघ बहुधा पर्यटन हंगामात असतो किंवा वर्षातील काही महिन्यापुरताच असतो, त्याचबरोबर जे पर्यटक मुंबई-पुणे शहरापासून दूर असलेल्या पर्यटन स्थळी जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी राज्यातील पर्यटन क्षेत्रातील छोटया शहरानजिक पर्यटकांसाठी एक तर जागा उपलब्ध नाहीत किंवा फार थोडया प्रमाणात उपलब्ध असून तेथे पर्यटकांना समाधान देऊ शकणारी निवास व्यवस्था अपुरी ठरते. |
||||
![]() |
![]() |
|||
महाराष्ट्रात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रयत्नाने स्थानिक व राज्याबाहेरील तसेच परदेशी पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत आहे. राज्यातील विविध धार्मिक स्थळे, ऐतिहासिक महत्वाच्या जागा, समुद्र किनारे, डोंगरदऱ्या आणि जंगले या ठिकाणी पर्यटकांचा ओघ अधिक प्रमाणात वाढू लागला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अशा स्थळांचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले आहे की, बऱ्याच ठिकाणी बंगले, कोणीही रहात नसल्याने रिकामे पडून आहेत किंवा अशा जागांचा उपयोग निवासासाठी पूर्णपणे आणि कायम स्वरूपात घरमालकांकडून केला जात नाही. काही घरमालक हे आपले घर/ बंगले किंवा काही खोल्या विद्यार्थ्यांना काही काळाकरिता पेईंगगेस्ट तत्वावर देतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची अशी धारणा आहे की, अशा प्रकारचे पर्यटन क्षेत्रानजिक असलेले बंगले/ घरे की जे बाराही महिने निवासासाठी वापरले जात नाहीत किंवा बंद ठेवले जातात अशा निवास व्यवस्थेचा पर्यटकांसाठी उपयोग करून घेता येईल. विशेषतः ज्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ फक्त काही हंगामापुरता असतो अशा ठिकाणी पर्यटकांची उत्तम प्रकारे राहण्याची आणि न्याहारीची व्यवस्था करता येईल व कायम स्वरूपाची पर्यटन संकुले सरकारी खर्चाने बांधण्याची नजिकच्या काळात गरज पडणार नाही. स्थानिक घरमालकांची घरे/ बंगले पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिल्यास दोन फायदे संभवतात - एक म्हणजे पर्यटकांसाठी किफायती पध्दतीवर स्वच्छ, राहण्याची आणि निवासाची घरगुती सोय उपलब्ध होते. तसेच स्थानिक घरमालक किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वयंरोजगार मिळतो. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे राज्याबाहेरील किंवा परदेशी पर्यटकांना तेथे राहून स्थानिक संस्कृति, राहणी, चालीरिती आणि खाद्यपदार्थ यांची चांगल्याप्रकारे ओळख होते आणि पर्यटनस्थळांना भेट दिल्याचा खरा आनंद मिळेल. कोकणच्या बाबतीत विचार करता याचा दूरगामी परिणाम म्हणजे कोकणात कृषी पर्यटनाची संकल्पना साकार होण्यास फार मोठी चालना मिळू शकते. योजनेची ठळक मार्गदर्शक तत्वे पर्यटकांसाठी निवास आणि न्याहारी योजना या योजनेंतर्गत काही निवडक पर्यटन स्थळांमध्ये पर्यटकांसाठी तात्पुरती राहण्याची आणि न्याहारी देण्याची व्यवस्था असते. अशी निवासस्थाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यता मिळवलेली असावी लागतात. पर्यटकांना वापरासाठी देण्याची येणारी जागा/ बंगले/ वाडे अशी निवासस्थाने अर्जदाराच्या अधिकृत मालकीची असावीत. अर्जदार जर अधिकृत मालक नसेल तर निवासाच्या अधिकृत मालकाचा, अर्जदारास योजनेस सहभागी होण्यास हरकत नसल्यासंबंधी दाखला सादर करावा लागेल, अशा घरमालकांना/ अर्जदारांना या योजनेखाली प्रोत्साहन देण्यात येईल. मान्यताप्राप्त जागी अर्जदार-घरमालक यांनी पर्यटकांसाठी कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त दहा खाटांची (बेडस्) सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जे निवासस्थान/वाडा/बंगला पर्यटकांच्या निवासासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी वास्तू स्वच्छ आणि शांत परिसरांत असावी आणि अशा निवसस्थानी सहजरित्या जाणे शक्य व्हावे. मात्र उपलब्ध होणारा वाडा/घर/बंगला उत्तम आणि मजबूत बांधकामाचा असावा, आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असावा. तसेच अशा घराची रचना आकर्षक असावी. तेथे वीज, पाणी, न्याहारी, भोजन सुविधा उपलब्ध असणेही गरजेचे आहे. या योजनेची अधिक माहिती, मार्गदर्शन व नोंदणीसाठी प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जयस्तंभ, रत्नागिरी (दूरध्वनी क्रमांक 02352-223847) येथे संपर्क साधावा. |
||||
|
||||
| Go To Top Of Page | ||||