दिनांक:
 
 
मासिक राशीभविष्य
डिसेंबर 2009
रमेश बा. मावळंकर
रत्नागिरी
मोबाईल-9860886993
ग्रहस्थिती  
शुक्र, वृश्चिक, बुध-धनु, रवि -धनुत, गुरू-कुंभ, शनि-कन्हेत, राहू-धनुत, केतू-मिथुनेत, मंगळ-कर्केत.  
  मेष : गुरूकृपा होईल.
या महिन्यात आपणावर गुरूकृपा होणार असून शनि महाराजही आपणावर प्रसन्न आहेत. तेव्हा यश कीर्ति, प्रसिध्दी, मानसन्मान व धनप्राप्ती यांची आपणावर बरसात होणार आहे. त्यात राहूसारखा बलाढय ग्रह आपणाला धनलाभ व किर्ती देणेस आपल्या पाठिशी उभा आहे. तेव्हा या महिन्यात संधीचा वेळीच फायदा घेणे उचित ठरेल. व्यापारी वर्गाच्या व्यवसायात वाढ होवून पैसा व प्रसिध्दी मिळेल. मात्र अधिकाराचा दुरूपयोग करू नये असे राहू आपणाला सुचित करत आहे. खाण्यावर बंधन ठेवणे योग्य ठरेल. व्यसनापासून सावध रहावे. एकंदरीत हा महिना बंधन पाळल्यास सुख-समृध्दीचा जाईल.
     
  वृषभ : धाडसी बना
या महिन्यात नुकतेच आपल्या राशीला आलेले राहू-केतू आपणाला आगामी होणाऱ्या खर्चाची व येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याची सूचना देत आहेत, तथापि आपल्या पाठिशी धाडसी पराक्रमी मंगळासारखा ग्रह उभा आहे. तेव्हा धाडसाने पुढे जाणे इष्ट ठरेल. आपलं कर्तृत्व, बुध्दीचातुर्य व समयसूचकता पणाला लावणे योग्य ठरेल. नवीन जबाबदाऱ्या स्विकारू नयेत हेच योग्य ठरेल. वाद विकोपाला जाऊ देऊ नयेत. गुरूसारखा कीर्तिदाता 19 डिसेंबरपर्यंत आपणाला उत्तम साथ देईल. शनी महाराज मानसिक दौर्बल्य आणणेची शक्यता आहे. अध्यात्मिक उपासना वाढवावी. प्रवास टाळावेत. व्यावसायिकांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात जास्त लक्ष केंद्रीत करावे. धाडस हेच आपले शस्त्र व उपासना आपले शास्त्र आहे.
     
  मिथुन : गुरूकृपा होईल
गुरू हा एकच ग्रह असा आहे की वाईट स्थानात असता झालेला त्रास तो पुढील स्थानात गेल्यावर भरून देतो. या महिन्यापासून आपणावर गुरूकृपा होणार असून कीर्ति, यश, अपेक्षित अर्थलाभ आपणाला करून देणारा आहे. लग्नी असलेला केतू व सप्तमातील राहू आपणाला अनाठायी खर्च व घरात कलह करणेची शक्यता आहे. मंगळ भाषणात व बोलण्यात सौम्य भाषा वापरणेस सांगत आहे. शक्यतो शत्रू निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. अनेक समस्यांवर व अवघड कार्यात यश मिळवून देणेस गुरू समर्थपणे उभा आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. शक्यतो नवीन जबाबदाऱ्या स्विकारू नयेत. चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिला वर्गाला उत्साह होईल. विवाह इच्छूकांचे विवाह जुळतील.
     
  कर्क: समस्या दूर होतील
ज्या शनीमहाराजांच्या अवकृपेमुळे आपण अनेक संकटांना तोंड देऊन दीपस्तंभासारखे उभे आहात तेच शनी महाराज आपणावर या महिन्यात कृपा करणार असून यश, कीर्ति व मानसन्मान यांचा वर्षाव आपणावर करणार आहेत. नोकरवर्गाला उच्चपद व अपेक्षित ठिकाणी बदली संभवते. राहू महाराज वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ करणेची शक्यता आहे. अचानक धनलाभ संभवतो. गुरूकृपेने मंगल कार्यासाठी दूरचा प्रवास दर्शवितो. मात्र अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती संभवते. व्यापारी, कारखानदार व दूध व्यापारी यांना विशेष लाभ संभवतो. विवाह इच्छुकांचे विवाह अपेक्षितपणे जुळून येतील. मंगळ मात्र जागरण व तिखट खाणे यापासून सावध करतोय. या महिन्यात आपले व्यक्तीमत्व उजळून निघणार आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. घरात मंगल कार्य झाल्याने महिलावर्ग खूष राहील..
     
  सिंह : दक्षता घ्या
शनी महाराजांच्या साडेसातीमुळे खरं-खोटं याचा पडताळाही घेणेस आपणास फुरसत नाही. थोरामोठयांचा सल्ला अवघड कामात घेणं कठीण वाटतं. या महिन्यात शनी, मंगळ व राहू आपल्या विरोधात उभे राहणारे आहेत. विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणे व वेळीच तब्येतीची काळजी घेणे जरूरीचे आहे. तथापि 19 डिसेंबर 09 नंतर गुरूमहाराज उत्तम साथ देणारे आहेत. कवि, लेखक, कलाकार यांना शुक्र उत्तम साथ देणारा असून प्रसिध्दी व कीर्ति देईल. घरात मंगलकार्य होईल. चैनीच्या वस्तू खरेदी होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. व्यापारी, उद्योगपती व कारखानदार यांनी आर्थिक गुंतवणूक जपून व विचारपूर्वक करावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. गुरूकृपेने या महिन्यात यश संपादन करता येईल.
     
  कन्या : यश मिळेल
आपण जरी शनी महाराजांच्या साडेसातीच्या फेऱ्यात असलात तरी काळजीचे कारण नाही, कारण कीर्तीदाता गुरू, ग्रहराज, रवि, धाडसी पराक्रमी मंगळ यासारखे बलाढय ग्रह आपल्या पाठिशी अपेक्षित धनलाभ, कीर्ति, यश व मानमुराद देण्यासाठी समर्थपणे उभे आहेत. बुध्दी, मति, निती व अध्यात्मिक सामर्थ्य असलेल्या व्यक्तीला शनी उगाच त्रास देत नाही. शनी कठोर शिक्षक आहे, पाप करू देत नाही. लगेच शिक्षा देतो. कार्यात अडथळे आणणेचे काम शनी करतो. जुने आजार पुढे येण्याची शक्यता आहे. केतू व शनी वैर निर्माण करणेची शक्यता आहे. तेव्हा वेळीच सावध रहावे. अपेक्षित धनलाभ होईल. लेखक, कवी व कलाकार यांना प्रसिध्दी मिळेल. व्यापारी वर्गाला उत्तम महिना जाईल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग आहे. मंगळ महाराज पैसा व जमीन जुमल्याची कामे याच महिन्यात प्रगतीपथावर आणतील. राहू घरगुती कटकटी वाढविणेची शक्यता आहे. तरी वाद वाढवू नयेत. विद्यार्थ्यांची अभ्यासात उत्तम प्रगती होईल. महिलांना हा महिना आनंद व सुख देणारा आहे.
     
  तुळ : धनलाभ होईल
आपला राशिस्वामी कलागुणांचा विकास करणारा व उत्साहमूर्ती शुक्र आहे व तो या महिन्यात आपणाला धनलाभ व प्रसिध्दी देणारा आहे. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना रविमुळे बढती व बदली मिळून अपेक्षापूर्ती होईल. राहू सुखात भर टाकेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिध्दी कीर्ति व अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. व्यापारी वर्गाचा वापर वाढून अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. मंगळामुळे मानसिक दौर्बल्य येण्याची शक्यता आहे. तरी प्रसंगावधान राखावे. लवकरच आपणावर गुरूकृपा होणार आहे. गुरूमुळे सर्व तऱ्हेची सुख लाभतील. अडलेली अवघड कामे हातावेगळी होतील. मित्रमंडळीचे सहकार्य उत्तम लाभेल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. कवी, लेखक, कलाकार यांना प्रसिध्दी व कीर्ति मिळेल. विद्यार्थ्यांची व खेळाडूंची प्रगती होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना यश व उच्चपद मिळेल. महिला वर्ग घरात चैनीच्या वस्तू आल्याने खूष होतील.
     
  वृश्चिक : शनिकृपा होईल
शनि हा ग्रह अर्थदाता व वैभव देणारा आहे. या महिन्यात आपणावर शनिकृपा होणार असून आपल्याला अनेक अवघड कार्यात यश मिळणार असून कीर्ति, अर्थप्राप्ती होण्यासारखा हा महिना आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना यश कीर्ति मिळेल. दीर्घकाळ टिकणारे व्यवसाय म्हणजे शेती, खाणीचा उद्योग, सिमेंट, स्टील, कापूस इ. उद्योग करणाऱ्यांना अपेक्षित धन मिळेल. विवाह इच्छुकांचे विवाह अपेक्षेप्रमाणे जुळतील. अनाठायी खर्चावर व तब्येतीवर लक्ष ठेवणेस राहू-केतू सूचना देत आहेत. बुध्दीचातुर्यानेच कामे करावीत व नवीन जबाबदाऱ्या स्विकारू नयेत. मनोदौर्बल्य झटका व धाडसाने यश संपादन करावे. यशोदेवता आपणाला माळ घालणार आहे. तेव्हा काळजी नसावी. गृहिणींना हा महिना चैनीच्या वस्तू व अर्थप्राप्ती करून देणारा आहे. लेखक, कलाकारांना प्रसिध्दी मिळेल. हा महिना सर्व बाजूंनी यश व कीर्ति देणारा आहे.
     
  धनु : उत्साह वाढेल
आपला राशिस्वामी कीर्तिदाता गुरू आहे, या महिन्यात गुरू आपणाला यश, कीर्ति देणारा असून अवघड कार्यात सफलता देणार आहे. शुक्र महाराज उत्साह, अपेक्षित धनलाभ व विवाह इच्छुकांचे विवाह जुळवून आणेल. प्रभावी नेतृत्व, दातृत्व व कर्तृत्व यांच्या जोरावर आपण प्रगतीच्या मार्गावर जाणार आहात. मंगळ महाराज वाहनापासून सावध रहाणेस सांगत आहेत. राहू-केतू घरगुती वाद विकोपाला नेण्याची शक्यता आहे. तेव्हा वेळीच दक्षता घ्यावी. कुलदैवतेचा नवस बोलला असल्यास वेळीच फेडावा. बुध्दी-चातुर्याची चुणूक दाखवाल व प्रसिध्दी मिळेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. दूरचा प्रवास टाळावा. मन खंबीर ठेवून दौर्बल्य टाळून यश पदरी पाडावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात खूप मेहनत घ्यावी. लेखक, कलाकार व महिला वर्गाला हा महिना सुख देणारा आहे.
     
  मकर : आर्थिक वसुली होईल
आपला राशिस्वामी शनि असून तो अवघड कार्यात अडथळे आणतोय. आर्थिक व्यवहारात आपण गुंतलेले आहात. तथापि काळजी करण्याचे कारण नाही. केतू व शुक्र आपणाला अचानक धनलाभ करून देणारे आहेत. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभही दर्शवितो. मात्र यापुढे आर्थिक व्यवहार जपून करणेच इष्ट होईल. मंगळ आपणाला पत्नीशी कलह तसेच नेत्र व पोट यांची काळजी घेणेस सांगतोय. वाद वाढवू नयेत. घरात स्थैर्य व शांतता राहिल याकडे लक्ष देणे जरूरीचे आहे. व्यापारी उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती राहिल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना यश व किर्ती लाभेल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळन येतील. घरात मंगल कार्य होऊन महिला वर्ग आनंद राहिल.
     
  कुंभ : खंबीर बना
आपल्या राशिचा राशिस्वामी शनि आहे. शनि अर्थदाता, बलदाता व उद्योग व्यवसायात भरभराट करणारा आहे. या महिन्यात शनि अष्टमस्थानात असला तरी तो काहीही वाईट करणार नाही. ग्रहराज रवि, धाडसी व पराक्रमी मंगळ आणि राहू आपल्या पाठिशी यश किर्ती व पैसा देणेस समर्थपणे उभे आहेत. शत्रू मित्र बनतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना यक्ष व मानमुराद मिळून वैभव प्राप्त होणार आहे. भाग्य उजळेल व सुख प्राप्त होईल. लवकरच आपणावर गुरूकृपा होवून परदेशागमन योग येईल. उद्योगपती, व्यापारी यांना अपेक्षित धनप्राप्ती होईल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. केतू आपणाला अनाठायी खर्च करण्यास लावणार आहे. लेखक, कलाकार यांना बुध्दीचातुर्याने यश व प्रसिध्दी संपादन करता येईल. तब्येत उत्तम राहिल. भांडण व कलह मिटविण्याचे भानगडीत न पडणे इष्ट. घरात मंगलकार्य झाल्यामुळे महिला वर्ग खुष राहिल.
     
  मीन : उच्चपद लाभेल
या महिन्यात ग्रहराज रवि आपल्या हातून मोठे कार्य करून घेऊन आपणाला उच्चपदावर विराजमान करतील, अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. समाजात मान सन्मान व कीर्ति बुध आपणाला मिळवून देईल. राहू महाराज लाभदायक घटना घडवतील. या महिन्यात आपण अपेक्षापूर्ती करून घेणार आहात. मात्र हे सर्व करताना शनि व मंगळ आपणाला दौर्बल्य निर्माण करणेची व अकारण शत्रू भीती निर्माण करणेची शक्यता आहे. अकारण प्रवास योग येईल. स्वजनांशी वादविवाद न वाढविणे योग्य होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद मिळेल. व्यापारी व कारखानदार यांना अपेक्षित धनप्राप्ती होईल. लेखक, कलाकार यांना प्रसिध्दी व पैसा मिळेल. घरात उत्तम घटना घडल्याने महिला वर्गात समाधान व्यक्त होईल.