दिनांक:
> मुख्यपान
 
पर्यावरण असमतोल आणि आपण
कु. श्रेयस आशिष मोहिते,
10वी, सेक्रट हार्ड कॉनव्हेंट हायस्कूल, रत्नागिरी.
> मुख्यपान
  पान 1
दिनांक: 16-04-2010
कित्येक अब्जावधी वर्षांपूर्वी आपली पृथ्वी निर्माण झाली आणि हजारो बदल घडत या वायूरूपी पृथ्वीला घनस्वरूप प्राप्त झाले. या दरम्यानच पृथ्वीभोवती वातावरणाची निर्मिती झाली आणि या वातावरणात जीवसृष्टी जन्माला आली. पृथ्वीवरील वातावरण आणि जीवसृष्टी यांच्या घनिष्ट संबंधालाच आपण 'पर्यावरण' म्हणतो. यामध्ये ज्यात आपण श्वास घेतो ती हवा, घन-द्रव-वायू ह्या तिन्ही अवस्थांमधील पाणी, जमीन, जमीनीवर रहाणारे आणि पाण्यातही वास करणारे प्राणी दोन्ही ठिकाणी असणाऱ्या वनस्पती यांचा समावेश तर होतोच पण निसर्गावर मात करू पाहणाऱ्या मानवाने जे-जे काही निर्माण केले त्याचाही समावेश होतो. निसर्गातील प्रत्येक घटक, मग तो सजीव असो किंवा निर्जीव- एकमेकांशी काही विशिष्ट नात्याने बांधलेला असतो. त्याची तुलना कोळयाच्या जाळयाशी करता येईल. हवा, पाणी, जमीन आणि हिरव्या वनस्पती हे या जाळयाचे आधार. यातला एक जरी आधार तोडला तर सगळे जाळे हादरते आणि तुटते. पर्यावरणाचेही असेच असते. या पर्यावरणाच्या 'जीवनाचे आधार' तोडले तर काय होईल ?
हा विचार आपण पूर्वी कधीच केला नाही. आपले पर्यावरण अतिशय अस्थिर आहे. त्यात सतत काही ना काही घडामोडी होत असतात. पर्यावरणाच्या सजीव किंवा निर्जीव कोणत्याही घटकात फरक पडला तर त्याचा संपूर्ण पर्यावरणावरच परिणाम होत असतो. पण या दृष्टीने आपण यापूर्वी कधी पाहिलेच नाही. पर्यावरण सुदृढ असावे यावर आपण लक्षच दिले नाही. सुदृढ पर्यावरण म्हणजे काय ? शास्त्रीय दृष्टया पर्यावर्णातील सर्व घटकांचा समतोल व्यवस्थित राखला गेला असेल, त्यातील निसर्गचक्रे उत्तमरित्या चालू असतील आणि त्यात प्राणीमात्रांचे निसर्गनियमाने ठरवून दिलेले आयुष्यमान प्राप्त होत असेल असे पर्यावरण सुदृढ म्हणता येते. मग या पर्यावरणात डोंगर, पर्वत, नद्या, सागर आणि त्याचे किनारे, खाडया, खेडी, शहरे, जंगले, त्यातील जीवसृष्टी सगळयांचाच सर्वकष विचार करावा लागेल. आपण कित्येकदा ऐकतो की पन्नासएक वर्षांपूर्वी आपल्या गावाचे वातावरण किंवा निसर्ग खूप छान होते. मग अत्ताच असे काय झाले ज्यामुळे हे सर्व बदलून गेले ? काही वर्षांपूर्वी दिसणारी झाडं आज दिसत नाहीत. काही वर्षांपूर्वी शेतात पिकवले जाणारे धान्य, त्यांच्या जाती आज पिकवल्या जात नाहीत. काही प्राणी, पक्षी फक्त फोटोंमधून, चित्रांमधूनच भेटतात. समुद्राची पातळी वाढल्याने, समुद्र किनाऱ्यांवर अतिक्रमण करत आहे. जलचरांच्या कित्येक जाती नामशेष झाल्या आहेत. वाढत्या कार्बनडायऑक्साइड आणि इतर ग्राीन हाऊस गॅसेसमुळे हवेचे तापमान वाढत चालले आहे. पावसाचे प्रमाणही आज कमी आहे. आपल्या राज्यात कित्येक ठिकाणी आज दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. शास्त्रीय व्याख्येनुसार 'मानव ज्या परिसरात राहतो, त्याच्या सभोवती असलेल्या परिस्थितीला पर्यावरण' म्हणतात. मग आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ज्या परिस्थितीत आपण राहतो आहोत, तिला पर्यावरण म्हणायच का ? 'जिवो जीवस्य जीवनम्: ।' हा पर्यावरणाचा नियम आहे. म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यलाही जगू द्या ! पण आज केवळ आपल्याच सुखसोयीच्या हव्यासात गर्क आहोत. Nature is sufficient for man's need but not for man's सीशशव ! खरच किती सीशशवू बनलो आहोत आपण ?
निसर्गाच्या नियमांच्या विरोधात जाऊन मानव जेव्हा स्वत:च्या फायद्यासाठी निसर्गाचा समतोल बिघडवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा निसर्गाच्या मूळ अवस्थेत बदल घडून येतो. उदा. जंगले तोडून कारखाने उभे करणे किंवा किनाऱ्याला संरक्षण देणारी मॅनग्रुव्हज दष्ट करून इमारती बांधणे. आपण नैसर्गिक संपत्ती, मग ती जंगलसंपत्ती असो, खनिजसंपत्ती किंवा जलसंपत्ती असो, यांचा विविध रितीने उपयोग करून घेतो. पण या वापराला कधीच मर्यादेचं भान नसत. देणारा निसर्ग देत जातो म्हणून आपण सगळचं त्याच्यापासून ओरबाडून घेत आहोत. प्रदुषण करणारे कारखाने, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण अशा अनेक कारणांमुळे आपण पर्यावरणाचा समतोल नष्ट करत आहोत.
पर्यावरण असमतोलाचे भयंकर संकट आज आपल्यापुढे उभे आहे. याला जबाबदार आपणच नं ? आज प्रदुषण, ग्लोबल वार्मिंग, ओझोन थराची छिद्रे हे शब्द आपल्या जीवनाचा भाग बनून गेले आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी जमीनीची धूप, हवेतले वाढते ग्रीन हाऊस गॅसेस, क्लोरो-फ्लोरो कार्बन वायूंमुळे पृथ्वीवरल्या ओझोन थराला पडलेली छिद्रे, सांडपाणी आणि कारखान्यांच्या प्रदुषित पाण्यामुळे नद्या, समुद्रातली नष्ट होत जाणारी जीवसृष्टी या सगळयांचा परिणाम आपण पहात आणि अनुभवतही आहोत. वाढती रोगराई, बर्डफ्लू, स्वाईनफ्लू सारख्या जीवघेण्या आजारांनी घातलेले थैमान, श्वसनसंस्थेच्या विकारात होणारी वाढ, एड्स, त्वचेचा कॅन्सर असे अनेक रोग आज आपल्याला भेडसावत आहेत. मानवाचं आयुष्यमान वाढल खर पण विविध रोगांना, विकारांना, व्याधींना त्याला आज तोंड द्याव लागत आहे. ध्वनीप्रदुषणामुळे वाढणारे भावनिक ताणतणाव, बहिरेपणा, निद्रानाश आणि हृदयाचे विकार यांनी पिडीत रोग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. पण या बदलत्या पर्यावरणाचा सर्वात खोलवर असा परिणाम आम्हा मुलांवर होत आहे याची जाणीव आपल्याला कधी होणार ? आज जगभरात असंख्य लहानमुले श्वसनमार्गाच्या समस्या, हृदयाचे रोग, कुपोषण आणि त्वचेच्या रोगांनी पिडीत आहेत. हे खुद्द णछखउएऋ या लहान मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेनेही मान्य केले आहे. पर्यावरणाचा ढासळता समतोल देशाच्या नव्या पिढीचे आयुष्य उध्वस्त करत आहे. अशी पिढी देशाचं भविष्य ठरू शकेल? मानव सुखासाठी धावू लागला आणि तुकाराम महाराजांनी कित्येक वर्षे पूर्वी दिलेला संदेशच विसरला. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी !'
पर्यावरणातील सर्व प्राणीमात्र, वृक्षवल्ली आपले सगेसोयरे आहेत हा तो संदेश ! आज आपण वाळवंटात पाणी नेऊन तेथे फुलबागा, फळबागा फुलवल्या. धरणे बांधून, नदीला बांध घालून त्यांना हवे तसे वळायला भाग पाडले. हरीतक्रांती, नीलक्रांती घडवून आणली. घरा-घरातून, गावा-गावातून वीज पोहचवली. अणूला मुठीत घेऊन 'अणुशक्ती मुक्त देश' अशी ख्यातीही आपण मिळवली. आता तर आपण सौर उर्जा, लाटांपासून उर्जाप्राप्ती अशा नव्या स्वप्नांचा ध्यास घेतला आहे. चांद्रयान मोहिम आखून ती पूर्णत्वास नेण्याचे बळ आपण मिळविले आहे. एकूणच निसर्गाला आपल्या मनानुसार, इच्छेनुसार वाकविण्यास आपण भाग पाडत आहोत. विकासाच्या वाटेवर चालताना, आपण आपल्या या अट्टाहासाची किंमत मोजत आहोत. याकडे दुर्लक्ष केल्याने होणारा ऱ्हास थांबणार आहे का? आपण निर्माण केलेली शस्त्रे आता आपल्यावरच उलटू पहात आहेत. कदाचित मानवाचे अस्तित्वच नष्ट करण्याकडे आपली वाटचाल सुरूही झाली असेल.
यासाठीच आज पर्यावरणाच दान पूर्णार्थान स्विकारण्याची क्षमता आपण आपल्यात विकसीत करायला हवी अस मला वाटतं. आपल्या पर्यावरणाने मुक्त हस्ताने आणि मनाने ही हवा, पाणी, अन्न, निवारा यासारखी प्रत्येक गोष्ट मानवालाच नाही तर सर्व सजीव सृष्टीला दिली आहे. त्याचा उपभोग आपण घ्यायलाच हवा. पण ते करताना या पर्यावरणाला कसे जपता येईल, त्याचे संरक्षण व संवर्धन कसे करता येईल याचा विचार आम्ही मुलांनीच करायची वेळ येऊन ठेपली आहे. आज पर्यावरणातील बदलांचे जे दूरगामी परिणाम आहेत त्यांना आम्हांला तोंड द्यावे लागत आहे आणि पुढेही लागणार आहे. म्हणूनच त्यांचा विचार आमच्यातच खोलवर रूजविण्याची आज गरज आहे. 'आज पेराल, ते उद्या उगवेल' या उक्तीनुसार पर्यावरणाबद्दलची जागरूकता आणि प्रेम आज आम्हा मुलांमध्ये रूजले तर त्याचे 'पॉझिटिव्ह रिझल्टस' येत्या वर्षांमध्ये नक्कीच पहायला मिळतील. पर्यावरणाच्या बाबतीत आम्हा मुलांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर, मोठयांना पर्यावरण तज्ञांना आणि पर्यावरणाचा सुखनैव उपभोग घेणाऱ्यांना द्यावीच लागतील मग !
आजच आपल बिघडत जाणार पर्यावरण सुदृढ करणं तर आपल्याच हातात आहे. यासाठी काही उपाय तर ाळलीश्रिर्शींशश्र पासून म्हणजे एका व्यक्तीपासून, आपल्याच पासून आपण करू शकतो.
1. प्रत्येक तोडल्या जाणाऱ्या झाडासाठी एक नवे झाड लावावे आणि त्याची जोपासना करावी.
2. प्लॅस्टिक, थर्माकोल साख्या विघटन न होणाऱ्या वस्तूचा वापर जास्तीतजास्त टाळावा.
3. रिडयूस, रियुज, रिपेअर आणि रिसायकल म्हणजे वापर कमी करा, पूर्नवापर करा, दुरुस्त करा आणि सगळयात शेवटी वस्तूचे रूपांतर दुसऱ्या घटकांत करा. 'फेकून द्या' हा यातला सगळयात शेवटचा आणि सगळयात कमी वापरात आणला जाणारा पर्याय बनवा.
4. सुखसोयींसाठी, आर्थिक विकासासाठी कारखाने व उद्योगधंदे तर हवेत पण त्यांचे प्रदुषण टाळण्याचे उपाय म्हणजे कारखान्यांभोवती झाडे लावणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एफ्लूएंट ट्रिटमेंट (एढझ) प्लांट असे उपाय कारखान्यांना सक्तीचे केले पाहिजेत. तस न करणाऱ्या कारखान्यांवर सक्त कारवाई ही करणे आवश्यक आहे.
5. ध्वनीप्रदुषण टाळणे व त्यासाठी लागू केलेले नियम पाळणे हे प्रत्येकाने आपले कर्तव्ये मानले पाहिजे.
6. सगळयात महत्त्वाचे म्हणजे, आपण जसे आपले घर, त्याभोवतीचा परिसर जपतो तसेच हे पर्यावरण आपण जपले पाहिजे.
चांगल्या प्रयत्नांची सुरुवात स्वत:पासूनच करायला हवी. 'मी माझ्या पर्यावरणाचे व त्यातील सर्व घटकांचे रक्षण करेन आणि त्याला जपेन.' अशी नवी प्रतिज्ञा आता आपण करायला हवी. आपण सगळेच जेव्हा या पर्यावरणाची बांधिलकी मानू, तेव्हा खरी सुदृढ पर्यावरणाची सुरूवात होईल आणि 'पन्नास वर्षांपूर्वी आमचं गाव अस होतं.' अस गावाच मॉडेल बघण्याचं आमच्या नशिबी येणार नाही.
खर तर पर्यावरणाला हानी पोहोचवण्याच काम कित्येक विकसीत राष्ट्रांनी सुरू केल. त्यांच्या देशात घडणाऱ्या घटना, भारतासारख्या विकसनशील देशाला मार्गदर्शक ठरू शकतात. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण आपला पर्यावरण रक्षणचा आराखडा ठरवू शकतो. त्यानुसार योग्य पावले उचलू शकतो. आपण या पर्यावरणाचे एक घटक आहोत. आपल श्रेष्ठत्व सिध्द करण्याच्या हव्यासापायी निसर्ग-नियमांना डावलणाऱ्या मानवाला, निसर्ग वेळ येताच, आपली जागा दाखवतोच. म्हणूनच म्हणावस वाटत,
पर्यावरणाचे गीत गाऊया ।
सारे आपण मिळून राहू या ॥
जमीन, पाणी, हवा ही आपुली
जीवनाची साखळी सजली
सजीव निर्जीव जमून राहू या
सारे आपण मिळून राहू या ॥1॥
समतोल जर ढळला इथला
जीवांचा मग विनाश न टळला
सोबती आपण सुखे जगू या
सारे आपण मिळून राहू या ॥ 2॥
पर्यावरण हे तुमचे माझे
त्यावरच हे जीवन तरले
जपण्या त्याला सिध्द होऊ या
सारे आपण मिळून राहूया ॥ 3॥
  पान 1
Go To Top Of Page