दिनांक:
> मुख्यपान
 
यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली !
श्रध्दा कळंबटे,
*जिल्हा बालकल्याण समिती सदस्य,
*समुपदेशक, कौटुंबिक सल्ला केंद्र,
9422430362,(02352-225430)
Shraddhakalambate@gmail.com.
> मुख्यपान
  पान 1
दिनांक: 16-04-2010
केवळ शैक्षणिक प्रगती म्हणजेच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असं जणू काही एक समीकरणच सध्या समाजमान्य झालेलं असल्यानं संपूर्ण समाजच एका चुकीच्या मार्गाने किंबहुना मृगजळाच्या मागे धावतोय अशी केविलवाणी परिस्थिती सर्वत्र निर्माण झालीय. यातून 'मुलांच्या आत्महत्या' हा ज्वलंत प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करू लागलाय. याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रत्यक्ष मुलं, पालक, शिक्षक आणि समाजातील इतर घटक एकमेकांना विचारताहेत. केवळ विचारून थांबत नाहीयेत तर त्याचं खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडण्याचा लाजिरवाणा प्रयत्न करताहेत. हे मी शिक्षक, पालक, मुलं यांच्याशी सुसंवाद साधताना ज्यावेळी प्रत्यक्ष पाहील, ऐकलं त्यावेळी या सर्वांच्या अज्ञानाची खरोखर कीव करावीशी वाटली. खर तर या सर्वांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करण्याची खरी गरज आहे.
गेल्या दशकात मुलांच्या संदर्भात जगभर घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करताना, जिल्हा बालकल्याण समितीवर गेली 7 वर्षे मुलांची विविध प्रकरणं हाताळताना भविष्यातील सूचक, विपरीत परिस्थितीची आम्हांला पूर्वकल्पना आलेली होती. मुलांचा जो मानसिक, भावनिक कोंडमारा होतोय, त्याचा उद्रेक हा होणारच याची पूर्ण खात्री होती. म्हणूनच 2006 पासून आम्ही पालक प्रबोधनाला सुरुवात केली. जे पालक यातून वेळीच सावध झाले त्यांनी आम्हांला धन्यवाद दिले परंतु ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहचू शकलो नाही त्यांनी खंतही व्यक्त केली.
आजवर हजारो शिक्षक, पालक यांच प्रबोधन करीत असताना त्यांच्याशी सुसंवाद साधलाय. हे कार्य असच सुरू राहणार आहे. प्रबोधन करीत असताना आम्ही प्रामुख्याने बालकांचे हक्क, त्यांना कसे, कोणी व केव्हा दिले, ते कोणकोणते आहेत, 2000 साली मुलांच्या कल्याणाकरता अस्तित्वात आलेला बालन्याय अधिनियम (ग. ग. अलीं) काय आहे, या कायद्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास झालाय का ? मुलांची सध्याची परिस्थिती काय आहे तसेच मुलांच्या संदर्भात पालक, शिक्षक व समाजाची कोणती जबाबदारी आहे या मुद्यांवर उदाहरणासहित माहिती देतो. त्यांच्याशी चर्चा करतो. आपल्या समाजात मुलांवर घडणारे अन्याय, अत्याचार यांच्या घटना ऐकून प्रत्येक जण सुन्न होतो आणि स्वत:शी कबूल करतो की मुलांना नाउमेद करण्यात, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यास आम्हीही काही अंशी जबाबदार आहोत.
वाचकहो, मुलं ही आपली भविष्यातील सुरक्षित ठेव आहे. प्रत्येक मुलांचं एक वेगळं, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. परंतु आपण मात्र त्यांना एकाच साच्यात घडवण्याचा खटाटोप करीत असतो. त्यांचं मूल्यमापन एकाच मोजपट्टीने करण्याचा आपला अट्टाहास असतो. ती मोजपट्टी म्हणजे त्याची शैक्षणिक प्रगती ! हे केवळ अशक्य आहे. एखादा विद्यार्थी उत्कृष्ट खेळाडू, गायक, लेखक, संगीतकार, नट अशा कोणत्याही क्षेत्रात पारंगत असू शकतो. आपण त्याचा तो कल ओळखून वेळीच त्याला त्या क्षेत्रातलं ज्ञान घेण्याची संधी उपलब्ध करून दिली तर तो आपल्या जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. अर्थात प्रत्येक क्षेत्रात समस्या, स्ट्रगल हा असणारच. परंतु विद्यार्थ्याच्या आवडीचं क्षेत्र असेल तर जिद्दीने तो संकटाचा सामना करताना दिसतो. अशी अनेक उदाहरण आपल्या समाजात आहेत.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तुंग यश आणि कीर्ती मिळवणाऱ्या व्यक्ती त्यांच्या शालेय जीवनात कित्येकवेळा नापास झालेल्या आहेत. तसेच बोर्डात मेरीट लिस्टमध्ये प्रथम आलेले विद्यार्थी त्यांच्या पुढील आयुष्यात अपयशी झालेले पाहायला मिळतात. मुलांनो, यातून काय बरं सिध्द होत? केवळ शैक्षणिक प्रगती, यशापयश हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली नाही तर तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुमच्या कुवतीनुसार तुम्ही स्वत:चा ठसा उमटवणं म्हणजेच यशस्वी जीवन. यातून तुम्हांला मिळणार समाधान आणि आनंद हा निव्वळ पैशापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे हे जेव्हा तुम्हांला कळेल त्यावेळी तुमच्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली तुम्हांला सापडलीच अस निश्चितपणे समजा. मात्र यासाठी मेहनत आणि संघर्ष करण्याची तयारी हवी. कारण ही एक तपस्या आहे.
सध्या परीक्षांचा मोसम सुरू झालाय. अजिबात टेन्शन घेऊ नका. आनंदाने, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. तुम्हांला यश नक्कीच मिळेल. तुमचे प्रयत्न अपुरे पडले असल्यास यश मिळणार नाही अस जरी वाटत असलं तरी ही घाबरून निराश होऊन घर सोडून पळून जाणं, आत्महत्या करणं असे टोकाचे निर्णय कधीही घेऊ नका. तुम्ही आयुष्यात खूप काही करू शकता. यासाठी तुम्हांला गरज आहे ती योग्य सल्ला आणि मार्गदर्शनाची तुमची कोणतीही समस्या असल्यास आमच्याशी जरूर संपर्क साधा.
  पान 1
Go To Top Of Page