दिनांक:
> मुख्यपान
 
आठवणीतील रत्नागिरी
-स्मिता राजवाडे
अ 2 कोहिनूर कॉम्प्लेक्स
सावरकर नाटय मंदिराजवळ,
नाचणे रोड, रत्नागिरी. 415 639
फोन नं. 222070
> मुख्यपान
  पान 1
दिनांक: 18-03-2010
1932 साली मुंबईहून रत्नागिरीला आलेले आणि आता निवृत्तीनंतरच जीवन सुखात जगणारे श्री. द. वि. ठाकूरदेसाई हे पटवर्धन हायस्कूलचे हिंदी,भूगोल, मराठी, इंग्रजीचे शिक्षक ! परंतु गेल्या चार पिढयांना हिंदीच मार्गदर्शन केल्यामुळे राष्ट्रभाषेचे हिंदीचे प्रसिध्द ! राष्ट्रभाषेचे निष्ठावंत प्रचारक, राष्ट्रपती पुरस्काराने, सन्मानित असे आदरणीय गुरुवर्य ! आज 84 व्या वर्षीही रत्नागिरीतल्या शैक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक,,साहित्यिक विश्वातलं आदरणीय व्यक्तिमत्व ! वयाच्या सहाव्यावर्षी ते बोटीतून उतरून मारूती आळीमधल्या किबेवाडयात राहू लागले ते आजपर्यंत. त्या वाडयाला फार मोठी परंपरा आहे वाडयातलं एकत्र कुटुंब आणि दारातला प्रसन्न परिजातक, स्वतंत्र देवाची खोली. अतिथींच प्रसन्न स्वागत हे वाडयातल्या माणसांचंच प्रतीक आहे.
तल्लख स्मरणशक्ती असलेले ठाकूरदेसाई सर 78 वर्षातल्या बदलत्या रत्नागिरीचं वर्णन करतात तेव्हा परिवर्तनाला नमस्कार करावासा वाटतो. विठ्ठलमंदिर, राधाकृष्ण मंदिर,राममंदिर,मारूतिमंदिर,घुडेवठार एकमुखी दत्त,राजिवडयातलं प्राचीन विश्वेश्वर मंदिर, खालच्या आळीतील दत्तमंदिर, तृणबिंदुकेश्वर भैरी,नवलाई पावलाई जुगाई,परशुराम मंदिर, ही मंदिर पुराण,भजन,किर्तन यामुळे सदैव जागती असत. पहाटे काकडारती व्हायची. प्राचीन मुरलीधर मंदिर आणि रत्नदुर्गा वरची भगवती ही नागरिकांची श्रध्दास्थांन होती. कै. भागोजीशेठ कीर यांच्याकडून स्वा. सावरकरांनी बांधवून घेतलेल पतितपावन मंदिर हे स्वा.सावरकरांच्या 'रत्नागिरी पर्वातलं' सामाजिक जाणीवांच महत्वाचं केंद्र ! तिथे सहभोजन होतं. मेळे शिवजयंती उत्सवात विविध कार्यक्रमातून पोवाडे,देशभक्तीपर काव्य तरूणाना प्रेरक होतं
गाडीतळावर बैलगाडया,गवताचा व्यापर,जुन्या तांबट आळीत गुरांचा बाजार भरे बरेचसे रस्ते मातीचेच. निवखोल,शिरगाव,मिऱ्या येथे प्राथमिक शाळा रत्नागिरीत एक,दोन नंबर शाळा होत्या. स्टेडियमजवळचं वाचनालय, जूनी दामले शाळा होती. कॉलेजच्या इमारतीचा व्यापार ब्रिटिश अधिकारी क्लबसाठी करत. 'कोमर ग्राउंड' फक्त युरोपियनांसाठी राखीव तर सामान्यांसाठी आजचं बी.एड कॉलेजचं ग्राउंड होतं क्रिकटचे प्रसिध्द खेळाडू होते पै. काझी कासम ,श्री चिलवान,बाष्टे शेठ, काशा पोलिस,राधाकृष्ण मंदिरात हुतूतू ,आटयापाटया,खोखो, लंगडीचे सामने होत 'शिमगा स्पोर्टस' स्वातंत्र्यलक्ष्मी चौकात होत.'थिबा पॅलेस' बद्दल सर्वाना कुतूहल होतं. तिथली हंडया झुंबर अगदी चार आठ आण्यात राजाने विक्रीला काढली (खर्च भागविण्यासाठी) त्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
ग्रामीण भागातून अटकं, बोरं, अळू काळपटरंगाची (फळं) आंबे (चार रुपये करंडा) करवंद, कुयऱ्या स्वस्तात मिळत. काजूगर एका पैशाला (तांब्याच्या) 50 ते 60 मिळत. तांदुळाचा गोण 4 ते 5 रु. ला मिळे. भाजी फारशी नसे. सर्वजण बोटीनेच प्रवास करीत. बोटी दररोज दोनवेळा येत. 'माझी आगबोट' 'मफतलाल गगनभाईंची बोट' या होत्या. सर्व्हीस मोटारी छोटया, जवळचे थांबे घेत. एक रुपयाला अकराशेर दूध घेणारे मध्यम, कनिष्ठ मध्यम वर्गीय लोक काटकसरीने रहात चैन ठाऊक नव्हती. गणपती, दसरा, दिवाळी, शिमगा हे सण साजरे करत. शिमग्यात देवांच्या पालख्या रोंबट पोमेंडीचे आकर्षक खेळे (कृष्ण गोपालवेशासह) पहाण मोठा विरंगुळा होता. त्यांचा 'गोफणखेळ' आकर्षक होता.
आता ती परंपरा लुप्त झाली असली तरी तेव्हा यू.पी.तल्या भैय्यांची 'रामलीला' महिनाभर सुरु असे.
प्राच्यविद्या प्रज्ञावंत डॉ. भांडारकर विष्णूशास्त्री चिपळूणकर, आगरकर, मामा वरेरकर न्यायमूर्ती खारेघाट यांचं या नगरीतलं वास्तव्य तसंच थोर चरित्रकार धनंजय कीर, व्ही. जी भाटकर (नामवंत भजनीबुवा) अशा अनेकांच्या आठवणीना उजाळा देताना पटवर्धन हायस्कूलच्या मागच्या शेतात गंधर्व कंपनीची 'अमृतसिध्दी', 'एकच प्याला', 'कान्हो पात्रा' ही नाटकं पाहिल्याची तृप्ती दिसते तशीच आत्ताच्या फडके उद्यानातलं झापांचं थिएटर नंतर 'लता','राधाकृष्ण टॉकीज', श्रीराम नाटयमंदिर या वास्तू आठवतात.
'पटवर्धन हायस्कूलच्या' फणसाच्या छायेत कै. अच्च्युतराव पटवर्धन यांच्याशी चर्चा करणारे स्वामी स्वरुपानंद (तेव्हाचे राष्ट्रीय शाळा चालवणारे पावसचे आप्पा गोडबोले) एस.एम. जोशी कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांचं स्मरणही पुण्यप्रद वाटतं.
दोनवेळा विमान उतरलेली पाहिली (पांढरा समुद्र, काळबादेवी) त्यांचे पंख उचलण्याचा प्रयत्न इथल्या धष्टपुष्ट तरुणांनी केला होता. 1939 ते 1944 काळात ब्रिटिशाचं सैन्य संचालन, लष्कर तळ, सरावासाठी लुटूपुटूच्या लढाया, चिलखतं, रणगाडे पाहिले.
राजकीय दृष्यही प्रतिष्ठेचं ! कोर्ट कचेरी क्लब यांच्या ब्रिटिश बांधणीच्या प्रभाव असलेल्या इमारती, रावबहादूर परुळेकर सतत 38 वर्ष प्रेसिडेंट हे केवढं आश्चर्य ! डॉ. शिंदे, डॉ. अ.वा. जोशी, डॉ. चव्हाण, डॉ. बेंजामिन, डॉ. पावसकर, मांडवीचे सुर्वेघराणं, गांधीशेठ, लुब्रीशेठ, लांजेकरशेठ, शिर्के घराणं, चितळे वकील, फडके, राजवाडे, आगाशे यांचे चौसोपीवाडे, नानल वकील, कलवारीवैद्य, भिबग्वर्य जोशी, अफ्रिकेतून रत्नागिरीत स्थिरावलेले डॉ. दाते खोत सावंत ही प्रतिष्ठित नाव रत्नागिरीचं भूषणच होती.
रत्नागिरी जवळच्या सोमेश्वरचे जोशी बंधू नाटयक्षेत्र गाजवणारे होते. 'तुझं आहे तुजपाशी' 'राणीचा बाग' 'शिवसंभव', 'तोतयाचं बंड' 'संस्कृत शाकुंतलं', 1945 सालचं हिंदी 'रक्षाबंधन' नाटक यात स्वत : ठाकुरदेसाई सरांचा सहभाग होता. नटवर्य होते. योजकचे नाना भिडे, डॉ. पंडित, श्रीकांत मुकादम, बबनराव बने, श्री सौ सह जोगसर कै. भाऊ शेटये, मिखणकर, अनंत शेठ रेडिज आणि स्त्रीपात्राचा अभिनय करुन आपल्या सुमधूर स्वरांची मोहिनी घालणारे निवृत्त शिक्षणाधिकारी श्री. कृ.दा.मोरे.
ज्ञानपरंपरेतले आदरणीय कै. गुरुवर्य अच्च्युतराव शंकरराव पटवर्धन, कै. ल.ग. पटवर्धन, कै. बाबूराव आणि मालतीबाई जोशी, कै. बाबीराव आणि त्यांचे बंधू पंत गोडबोले, गोगटे महाविद्यालयातले गुरु कै. वि. अ. कुलकर्णी, य.द. भावे, विं.दा.करंदीकर यांचं स्मरणही ठाकुरदेसाईसरना पुण्यप्रद वाटते. पहाटे चारला उठून देवपुजेत मग्न होणारे सर पंढरपूरकर बुवा, निजामपूरकर बुवा, गोगले बुवा यांच्या कीर्तनाची आठवण विसरलेले नाहीत. भालाकार भोपटकर, कै. द.वा. पोतदार, मामा दाते, जयवंतराव टिळक असे वक्ते, 1939 मध्ये भरलेलं साहित्य संमेलन, स्वा. सावरकरानी शुध्दीकरण करुन घेतलेले एक नातेवाईक यांच्या आठवणीना उजाळा देतात तेव्हा एखाद्या चलत् चित्रपटाप्रमाणे 1932 ते 2010 पर्यंतची 'स्मरणयात्रा' ऐकणाऱ्या, वाचणाऱ्या सर्वानाच आश्चर्य मिश्रित आनंदाचं गुलाबपाणी शिंपडल्या सारखं वाटण्याची अनुभूती देते.
  पान 1
Go To Top Of Page