दिनांक:
> मुख्यपान
 
थिबा राजवाडा-शताब्दी वर्ष
 
> मुख्यपान
  पान 1 पान 2
दिनांक: 15-11-2009
थिबा राजवाडा -रत्नागिरी शहराला लाभलेल्या अनेक ऐतिहासिक वारसांपैकी सर्वात महत्वाचा वारसा! दिनांक 13 नोव्हेंबर 1910 रोजी वापरात आलेल्या या राजवाडयाचे आजपासून शताब्दी वर्ष सुरू होत आहे. रत्नागिरीच्या गेल्या शतकभराच्या वाटचालीचा हा एक मूक साक्षीदार!
रत्नागिरी शहरात स्थानबध्द केलेल्या आणि येथेच चिरनिद्रा घेणाऱ्या थिबा राजाबद्दल अनेक मत मतांतर असू शकतात. पण त्याच्या वास्तव्यामुळे व त्यानंतर त्याच्यासाठी बांधलेल्या राजवाडयामुळे रत्नागिरीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले ह्याबद्दल कोणतेच दुमत असू नये. लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या रत्नागिरी शहराचा इतिहास पेशवाईतील तोतया सदाशिवभाऊच्या रत्नदुर्ग किल्ल्यातील व थिबा राजाच्या शहरातील वास्तव्याच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच राहिल.
थिबा राजाच्या भारतातील वास्तव्याशी निगडीत आणखी एक दुखरी किनार आहे. ब्रह्मदेशचा हा शेवटचा राजा ब्रिटीशांनी बंदिवान बनवून भारतात आणला आणि मृत्युपर्यंत येथेच बंदिवान म्हणून राहिला. मृत्युनंतर त्याचे पार्थिवसुध्दा ब्रह्मदेशला नेण्याची परवानगी तत्कालीन ब्रिटीश सरकारने नाकारली आणि तोच दुर्दैवी इतिहास हिंदुस्थानच्या शेवटच्या बादशहाच्या नशिबी आला. हिंदुस्थानचा शेवटचा बादशहा बहाद्दूरशहा जेफर हा ब्रिटीश सरकारने बंदिवान म्हणून ब्रह्मदेशमध्ये नेला व तेथेच त्याचा दुःखद अंत झाला. त्याचेही अंत्यसंस्कार भारतात न करता ब्रह्मदेशमध्येच केले गेले.
आपापल्याला देशाच्या शेवटच्या राजांच्या नशिबी चिरनिद्रा घेण्यासाठी आपली मातृभूमी नसावी ह्यासारख्या दैवदुर्विलास नाही असं हे रत्नागिरी आणि रंगूनचे विचित्र नातं!
16 एप्रिल 1886 ला रत्नागिरीत कैदी म्हणून आणलेल्या थिबा राजाबरोबर असलेल्या कुटुंबियांना व नोकरचाकरांना राहण्यासाठी ब्रिटीश सरकारने दोन बंगले भाडयाने घेतले. त्यांचे भाडे होते प्रत्येक बंगल्याला प्रत्येक महिन्याला रु. 80/-, एक बंगला होता अक्कलकोट संस्थानचे दिवाण 'रावबहाद्दूर नारायण वासुदेव बर्वे' यांचा आऊटराम हॉल, तर दुसरा होता रावसाहेब 'भास्कर विष्णू फडके' यांचा बेकर बंगला. सध्या हे ठिकाण डी.एस.पी. बंगला या नावाने ओळखले जाते. दोन्ही बंगल्यांची डागडुजी करून संरक्षणासाठी गार्डरूम बांधून घेण्यात आली. राजासाठी फळे व बर्फ मुंबईहून आणला जात असे. पण नंतर पावसाळयात बोटींची वाहतूक चालू नसल्याने बंगल्याच्या आवारात बर्फाचे मशीन बसवण्यात आले. इन्स्पेक्टर दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे संरक्षणाची जबाबदारी होती. थिबा व तत्कालीन कलेक्टरमधील सुसंवादासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आला होता.
जुन्या रत्नागिरीचा विचार करता हे दोन्ही बंगले तसे गावापासून दूरच होते पण त्यावेळी आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये अनेक गावकरी बंगल्याच्या सभोवती असलेल्या कातळावरती झोपडया बांधून राहिले. सरकारी उल्लेखाप्रमाणे 1905 पर्यंत एकंदर दोन वेळा थिबा राजा व परिवारास प्लेगच्या साथीमुळे बंगल्यातून तात्पुरते बाहेर काढावे लागले होते. त्यामुळे 1905 च्या डिसेंबरमध्ये थिबाने ब्रिटीश सरकारला नवीन निवासस्थान बांधण्याबद्दल विनंती केली. लॉर्ड लॅमिंग्टन ह्या त्यावेळच्या मुंबई प्रांताच्या गव्हर्नरने रत्नागिरीत येऊन थिबाची भेट घेतली आणि प्रत्यक्ष पाहणीनंतर व्हाईसरॉयला पाठवलेल्या पत्रात त्याने लिहिले, 'थिबा राजाने काटकसरीत रहावे अशी जरी सरकारची इच्छा असली तरीही त्यांची इभ्रत पहाता त्याला अधिक चांगल्या दर्जाच्या सुविधांची गरज आहे. ज्या सुविधा पदच्युत पेशव्यांना मिळतात तशाच किंवा त्यापेक्षा अधिक सुविधा राजास देण्यात याव्यात. ब्रह्मदेशचे राज्य खालसा केल्यानंतर ब्रिटीश सरकारच्या तिजोरीत झालेल्या वाढीचा विचार करता थिबास अधिक चांगल्या सुविधा देणे आवश्यक आहे.'
  पान 1 पान 2
Go To Top Of Page