![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
![]() |
| इये मत्स्यालयाचिये नगरी | ||||||
| -सौजन्य: सुरेश नाईक | ||||||
| अथांग समुद्र किनारा हे कोकणचं वैभव. या विशाल सागराच्या पोटात अनेक मासे, शंख, शिंपले, समुद्र साप, महाकाय प्राणी आढळतात. यातील सर्वात आकर्षणाचा विषय म्हणजे तऱ्हेतऱ्हेचे मासे. माशाच्या विविध जाती, त्यांच्या हालचालीचा एक वेगळाच ढंग, त्यांच्या अन्नग्र्रहणाच्या पध्दती या सगळया गोष्टी प्रत्यक्षात पाहण्यात काही वेगळाच आनंद मिळतो. खरंच कोणतीही निर्जीव वस्तू बघण्यापेक्षा सजीव वस्तू बघण्यातच मजा येते. म्हणूनच देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सागरी सफरीचं एक अनोखं दालन मत्स्यालयाच्या रूपाने रत्नागिरीतील 'सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र' या संस्थेने सर्वांसाठी खुले केले. शहरापासून जवळच पेठकिल्ला या भागात ही संस्था आहे. हा संपूर्ण परिसर मत्स्य व्यवसायासाठी प्रसिध्द आहे. 'सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र' या संस्थेत प्रवेश करताना प्रथम दर्शनी आपल्या दृष्टीस पडते ती वास्तूवर लावलेली शार्क माशाची प्रतिकृती आणि दुसरं म्हणजे 'वर्षा' नावाची यांत्रिक नौका. ही महाराष्ट्रातील पहिली पावसाळी यांत्रिकी नौका, येथे नाममात्र शुल्क देऊन आपल्याला सागर सफरीचा आनंद लुटता येतो. या मत्सालयातील विशेष आकर्षण म्हणजे पिल्ले देणारा नर घोडा मासा. या माशाच्या तोंडाचा आकार हा घोटयाप्रमाणे असल्याने त्याला घोडा मासा किंवा समुद्री घोडा म्हणतात. परदेशात मृत झालेल्या घोटा माशालादेखील पाचशे रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागते. घोडा माशाबरोबरच पाठिवर क्रॉस असलेला ख्रिश्चन खेकडा, तसेच हजाम मासा, साळींदर पक्षाप्रमाणे काटे फुलविणारा साळींदर मासा, सागरी काकडो, ट्रिगर मासा, हेकरू, कोंबडा, गुलाबी, चिरई इत्यादी जातीचे मासे आपल्याला या मत्स्यालयात बघता येतात. माशाबरोबरच येथे 30-35 वर्ष वय असलेली दोन समुद्र कासवेदेखील आहेत. परकीय चलन मिळवून देणारी सागरी शेवंड या ठिकाणी आहेत. यांचा अन्नग्रहणाचा कालावधी संधीप्रकाशात असल्याने यांची मासेमारी बहुतांशी काळोखात चालते. याचे वैशिष्टय म्हणजे ही शेवंड खाद्य पकडताना आपल्या दृष्टीपेक्षा घाणेंद्रियांचा वापर जास्त करतात. सागरी माशांबरोबरच पर्यटकांना गोडया पाण्यातील माशांची ओळख व्हावी यासाठी गोल्ड फिश, अेंजल फिश, रेडस्वार्ड टेल, रोझीबार्ब, ब्लॅकमोली इत्यादी शोभीवंत माशांचा समावेश या मत्स्यालयामध्ये केला आहे. या शोभीवंत माशांची देखभाल कशी करावी यासंदर्भात मार्गदर्शनदेखील या ठिकाणी केलं जातं. अनेक रोजगाराच्या संधी या मत्स्य व्यवसायातून आज निर्माण झालेल्या दिसतात. याच इमारतीच्या एका दालनात पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या 55 फुटी देवमाशाचा हाडांचा सांगाडा ठेवलेला आहे. हा देवमासा रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी सन 1980 मध्ये आढळला. त्यावेळी त्याची लांबी 55 फूट व ताेंडाचा आकार उंचीने दोन फूट व लांबीने 6.5 ते 7 फूट होता. त्याचे वजन 5 टन होते. त्यावेळी तो तेथेच वाळूत पुरण्यात आला होता. त्यानंतर 2 महिन्यांनी स्वच्छ हाडाचे सांगाडे येथे आणण्यात आले. हा सांगाडा डोक्याची कवटी, 19 बरगडी व 40 मणके यांनी बनलेला आहे. देवमासा काहीवेळा मोठमोठी जहाजेदेखील सहजगत्या फोडू शकतो किंवा ओढून समुद्रात नेऊ शकतो. यावरून त्याच्या अजस्त्रतेची कल्पना येते. सर्व सागरी प्राणी सृष्टीत देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणून ओळखला जातो. याच भागात दुर्मिळ माशाचा संग्रह बाटलीमध्ये जपणूक करून ठेवला आहे. यात विषारी समुद्रसाप, ऑक्टोपस, वीज मासा, नारळी मासा, सापासारखी दिसणारी रेचन, पाखरू मासा, गिटार मासा यासारखे वैशिष्टयपूर्ण मासे तर उपयुक्त मांशांमध्ये पापलेट, शेवंड, सुरमई, म्हाकूळ, बळा, कोळंबी, बांगडा इत्यादी माशांचा समावेश आहे. याचबरोबर मृदूकाय प्राणीदेखील आपल्याला पहावयास मिळतात. अशा या सागरी जीवांच्या वैविध्याने नटलेल्या मत्स्यालयाला पर्यटकांनी जरूर भेट द्यायला हवी. अखिल महाराष्ट्रात असलेले हे दुसरे मत्स्यालय. मनोरंजनाबरोबरच अभ्यासासाठी देखील आपल्याला उपयोग होतो. मत्स्य व्यवसायातील प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करणे तसेच अनेकविध सागरी प्राण्यांशी हितगुज आपण नक्कीच करू शकतो. चला तर मग या मत्स्यालयाला भेट द्यायची ना! |
|
|||||
![]() |