![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| झिमण गटाचा बहिष्कार, जिल्हाध्यक्षपदी रमेश कीर यांची पुन्हा निवड, निर्णय पक्षश्रेष्ठी जाहीर करणार | |
| दिनांक: 28-07-2010 | |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : काँग्रेस जिल्हाध्यक्षपदावरून गेले काही दिवस निर्माण झालेल्या वादामुळे आज मोठा गाजावाजा करून घेण्यात आलेल्या निवडणुकीत झिमण गटाने बहिष्कार घातला. त्यामुळे म्हाडाचे सभापती रमेश कीर यांची जिल्हाध्यक्षपदी परत एकदा एकमताने निवड झाली. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा पक्षश्रेष्ठींकडून येत्या दोन-तीन दिवसात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आज काँग्रेस भवनमध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेसचे 62 सदस्य उपस्थित होते. त्यांनी एकमताने हात वर करून कीर यांच्या जिल्हा अध्यक्षपदाला मान्यता दिली. त्यामुळे झिमण गटाला मोठा फटका बसला आहे. झिमण गटाच्या मागे नुतन खासदार हुसेन दलवाई असल्याने कोकणचे नेते नारायणराव राणे यांचा पाठिंबा मिळविण्यात कीर गट यशस्वी झाला. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी पार पडली. काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी शहाजी पाटील यांनी कीर समर्थक क्रियाशील सदस्यांची यादी स्विकारली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत कीर यांनी दाजी परकर यांचा 42 मतांनी पराभव केला होता. परंतु या निवडणूक प्रक्रियेलाच माजी जिल्हाध्यक्ष सुजित झिमण यांनी व त्यांच्या समर्थकांनी पक्षश्रेष्ठींकडे आव्हान दिले होते त्याप्रमाणे आज ही नवीन निवडणूक प्रक्रिया पार पडली. परंतु या निवडणुकीत झिमण गटाने दिलेली सदस्यांची यादी पक्षाच्या निवडणूक निरीक्षकांनी स्विकारली नाही. त्यामुळे झिमण गटात नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे झिमण गटाचे समर्थक व काँग्रेसचे प्रवक्ते इब्राहीम दलवाई यांनी आज होणाऱ्या निवडणुकीवर झिमण गट बहिष्कार टाकणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. निरीक्षकांवर संतप्त झालेल्या दलवाई यांनी निवडणूक अधिकारी शहाजी पाटील यांची उचलबांगडी करा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली होती व आजच्या निवडणुकीत कोणीही निष्ठावंत कार्यकर्त्याने उपस्थित राहू नये असे आवाहन केले होते. परंतु 80 सदस्यांपैकी जवळजवळ 62 सदस्यांनी उपस्थित राहून कीर यांना पाठिंबा दिल्याने झिमण यांची ताकद उघडी पडली आहे. या निवडीबाबत नुतन जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. |
![]() |