![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| रत्नागिरी जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती कायम, निवसरचा रेल्वे ट्रॅक पुन्हा खचला, केरळला जाणारी मधुसागर एक्स्प्रेस मध्येच अडकली |
| दिनांक: 25-07-2010 |
![]() ![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरीजवळच्या निसवर रेल्वे स्थानकाच्या खचलेल्या एका ट्रॅकखाली खडी टाकत कोकण रेल्वेने रात्री उशीरा केरळला जाणारी मधुसागर एक्स्प्रेस येथून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि ही गाडी रत्नागिरीतून निवसरला पोहोचेपर्यंत निवसरचा ट्रॅक पुन्हा खचला. यामुळे मधुसागर एक्स्प्रेस या खचलेल्या भागापासून अवघ्या काही अंतरावर उभी करण्यात आली. याचवेळी रेल्वेच्या मागील बाजूस रत्नागिरीच्या दिशेला रेल्वे मार्गावर दरड कोसळली. यामुळे मधुसागर एक्स्प्रेस मध्येच अडकली. |
![]() ![]() |
| दरम्यान या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आडवली (ता. लांजा) येथून परत मडगांवकडे वळवून रेल्वे सेवा सुरू ठेवण्यात आली. प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून रेल्वेच्या मागणीनुसार एस.टी. महामंडळाने 30 जादा गाडया सोडल्या आहेत. या रेल्वेमधून सुमारे 1500 प्रवासी प्रवास करत होते. निवसर स्थानकात या प्रवाशांना खाण्यापिण्यासाठी काहीच व्यवस्था नसल्याने त्यांचे फार हाल झाले. या भागात मोबाईलला रेंज नसल्यामुळे सदर प्रवाशांना आपल्या नातेवाईकांनाही संपर्क साधता येत नव्हता. |
![]() ![]() |
| दरम्यान पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला असून गेल्या 24 तासात 122.6 मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. खेड, संगमेश्वर, रत्नागिरी व लांजा या चार तालुक्यात पावसाचे तांडव सुरू होते. नद्यांच्या पात्रांनी पातळी ओलांडल्याने चिपळूण, राजापूर, खेड तालुक्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खेड शहराला जगबुडी नदीने पुराचा वेढा घातला होता. पुराचे पाणी वाढू लागल्याने दुकानदारांनी दुकाने बंद करून वेळीच सुरक्षित पावले अचलली. संगमेश्वरातील बावनदीला आलेल्या पुरामुळे शेतजमिन पाण्याखाली गेली. रत्नागिरी तालुक्यातील तब्बल 87 घरांतीलव 94 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. काजळी नदीला आलेल्या पुराने चांदेराई, हरचेरी, सोमेश्वर, पोमेंडी, टेंभ्ये या पाच गावांना वेढा घातला होता. पुराचे पाणी गावात शिरल्यामुळे हा भाग पूर्णतः जलमय झाला होता सोमेश्वर गावाचा रत्नागिरी शहराशी संपर्क तुटला, सोमेश्वर येथील मोहल्ल्यात पाणी शिरल्याने 41 कुटुंबांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आले. लांजा-रत्नागिरी मार्ग काल रात्रीपासून बंद करण्यात आला. रात्री पुलावर सुमारे चार ते पाच फुट पाणी होते. असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. चांदेराई येथील 6 कुटुंबातील 27 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. हरचेरी कसबावाडीचे पूर्णतः स्थलांतर करण्यात आले. 29 कुटुंबांना पुराचा फटका बसला असून 135 व्यक्तींना हलविण्यात आले आहे. कसबावाडीबरोबरच अन्य दोन वाडयांतील लोकांचेही स्थलांतर करण्यात आले. कर्ला येथील दिनेश विठोबा सुर्वे यांच्या घरात पाणी शिरले आणि घराची भिंत कोसळून मोठया प्रमाणात नुकसान झाले. कोळंबे येथे देवीदास भाताडे यांच्या घराना भेगा गेल्या आहेत. तसेच त्या परिसरातील सगळीकडेच भेगा पडल्याने भाताडे कुटुंबीय नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहे. रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर नेवरे-ढोकमळे येथे रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक ठप्प आहे. रत्नागिरीचे तहसिलदार जगदीश कातकर यांनी पुरग्रस्त परिसराची पाहणी केली. राजापूरच्या जवाहर चौकात सलग पाचव्या दिवशी पाणी साचले असून पावसाचा जोर वाढल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. मध्यवर्ती जवाहर चौकात पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे. वाशिष्ठी नदीला पूर आल्याने चिपळूण शहरातही पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. खेड शहराची स्थितीही तशीच झाली आहे. जगबुडी आणि नारंगी नद्यांना पुर आला असून पुराचे पाणी वाढत आहे. त्यामुळे खेड शहरालाही पुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात अन्यत्र सर्वच ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. गुहागर येथील पुजा महादेव साटले (11) ही वहाळात पडून वाहून गेली. तिचा मृतदेह सापडला आहे. यावर्षी आतापर्यंत पावसाचे 19 बळी नोंदवले गेले आहेत. सतत धोधो पडणाऱ्या पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून सर्वत्र हाहाकार उडाला आहे. आगामी काळात असाच पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. |