![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| कोकण रेल्वे सेवा कोलमडली, निवसर स्थानकाचा प्लॅटफॉर्म व रेल्वे रूळ दहा फुटांनी खचले, युध्दपातळीवर दुरूस्तीचे काम सुरू, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा |
| दिनांक: 24-07-2010 |
![]() ![]() |
![]() ![]() |
![]() |
| रत्नागिरी, (रूबिन मुजावर) : कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून दर पावसाळयात कोकण रेल्वे महामंडळाला अत्यंत डोकेदुखी ठरलेले निवसर स्थानकाचा प्लॅटफॉर्म व स्टेशन परिसरातील रूळ काल रात्रौ सुमारे 10 फूट खचले गेल्याने मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे कोकण रेल्वेने या मार्गावरील अनेक गाडया रद्द केल्याने संपूर्ण कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या दुरूस्तीचे काम कोकण रेल्वेने युध्दपातळीवर हाती घेतले असून सुमारे 500 कर्मचारी, अधिकारी व कोकण रेल्वेची यंत्रणा अहोरात्र काम करीत असून तरीदेखील हे काम पूर्ण होण्यास अंदाजे दोन दिवस जातील असा अंदाज कोकण रेल्वेच्यावतीने वर्तविण्यात येत आहे. मात्र परिस्थिती पाहता अधिक काळ रेल्वेसेवा बंद राहू शकते असे चित्र दिसत आहे. दरम्याने निवसर ग्रामस्थांच्यामध्येही कोकण रेल्वेबाबत मोठी नाराजी निर्माण झाली आहे. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून निवसर परिसरात दरवर्षी पावसाळयात रेल्वे रूळ खचण्याचे व स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला भेगा पडण्याचे प्रकार दरवर्षी घडत आहेत. या स्टेशनची निर्मिती करताना स्टेशनजवळ असलेल्या नदीच्या काही प्रवाहांवर भर घालण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षी सतत पाऊस पडला की रूळ खचण्याचे व भेगा पडण्याचे प्रकार होतात. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी कोकण रेल्वेने अनेकवेळा भूगर्भ शास्त्रज्ञांमार्फत पाहणी करून त्यावर करोडे रुपये खर्च करून उपाययोजना केल्या होत्या. परंतु या उपाययोजना आता फोल ठरत आहेत. याशिवाय स्टेशनपासून जवळ असलेल्या ग्रामस्थांच्या घरांवरही त्याचे विपरित परिणाम होत असून कोकण रेल्वेचा वाहतुकीमुळे व भेगा पडल्यामुळे नागरिकांच्या घरांनाही भेगा पडत असल्याचे नागरिकांच्या तक्रारी असून त्यांच्यात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून निवसर स्थानकात रेल्वे रूळ खचण्याचे व भेगा पडण्याचे प्रकार सुरू झाले होते. सुरूवातीला हा रूळ सहा इंचांनी खचला होता. त्यानंतर कोकण रेल्वेने आपली ही यंत्रणा कामाला लावून डागडुजी केली होती व धिम्या गतीने वाहतूक चालू ठेवली होती. त्यातच दुरूस्ती करणारे मशिनही काल रूळावरून घसरले होते. परंतु काल रात्रौ ते पहाटेच्या दरम्याने या निवसर स्थानकाचा संपूर्ण प्लॅटफॉर्मच खचला गेला आहे. प्लॅटफॉर्मच्या ठिकाणचे सर्व काँक्रीट खचले असून त्याठिकाणी फक्त माती राहिली आहे. रेल्वेचे ट्रॅकदेखील 10 फुटांनी खचले असून वरती फक्त लोखंडी ट्रॅक शिल्लक दिसत आहेत व त्याच्याखालचा भराव व दगड वाहून गेल्याने मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय आजुबाजूच्या ग्रामस्थांच्या घरांनाही तडे गेल्याने ग्रामस्थांनीही त्या ठिकाणी धाव घेतली आहे. याबाबत कायमचा तोडगा न निघाल्यास ग्रामस्थांनी अंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूणच निवसर स्थानकाजवळ गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून कोकण रेल्वेने शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांच्या लांब पल्ल्याच्या आठही गाडया रद्द केल्या आहेत. यामध्ये मुंबई-कारवार, कारवार-मुंबई, जाणारी-येणारी जनशताब्दी एक्स्प्रेस व मत्स्यगंधा एक्स्प्रेस, नेत्रावदी एक्स्प्रेस आदींचा यामध्ये समावेश आहे. काही पॅसेंजर गाडया रत्नागिरीपर्यंत सुरू ठेवण्यात येत असल्याचे कोकण रेल्वेच्यावतीने सांगण्यात आले. मात्र एवढी परिस्थिती असूनही कोकण रेल्वेकडून अधिकृत कोणतीही माहिती देण्यात येत नाही. विधानसभेतही राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी निवसर स्थानकाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. |